दिलासादायक..सात तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

जळगाव जिल्ह्यात जुलै, ऑगस्टदरम्यान कोरोना संसर्गाने कहर केला. या अवघ्या दोन महिन्यांत ३५ हजारांहून अधिक रुग्ण वाढले. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ५० हजारांचा टप्पाही सप्टेंबरमध्येच ओलांडला.

जळगाव : जिल्ह्यात ऑक्टोबरपाठोपाठ नोव्हेंबरमध्येही कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. रोज रुग्णसंख्या घटत असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्ण कमी होत आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यांत ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहाच्या आत आली असून, या तालुक्यांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 
जळगाव जिल्ह्यात जुलै, ऑगस्टदरम्यान कोरोना संसर्गाने कहर केला. या अवघ्या दोन महिन्यांत ३५ हजारांहून अधिक रुग्ण वाढले. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ५० हजारांचा टप्पाही सप्टेंबरमध्येच ओलांडला. मात्र, १७ सप्टेंबरनंतर कोरोनाचे रोज आढळून येणारे रुग्ण कमी होऊ लागले. सलग दोन महिन्यांपासून नवे बाधित कमी व बरे होणारे रुग्ण अधिक अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन महिन्यांत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही दहा हजारांवरून थेट चारशेवर आली आहे. 

दहाच्या आत रूग्‍णसंख्या
सुरवातीच्या टप्प्यात धरणगाव, भडगाव, चाळीसगाव, पारोळा यासारखे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. त्या तालुक्यांमध्येही ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमालीची रोडावली असून, जिल्ह्यातील सात तालुक्यांत ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहाच्या आत आहे. यात जळगाव ग्रामीण- नऊ, भडगाव- सहा, धरणगाव- तीन, यावल- आठ, पारोळा-सात, चाळीसगाव- सात, मुक्ताईनगर- आठ, असे रुग्ण आहेत. त्यामुळे या तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचे चित्र आहे. आणखी काही दिवस या तालुक्यांत नवीन रुग्ण आढळला नाही, तर ते कोरोनामुक्त होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus sevan taluka corona free