
लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, अधिकारी यांची माहिती केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाला मागितली आहे.
जळगाव ः जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनावर येणाऱ्या लशीचे संशोधन अंतिम टप्प्यात असून, नववर्षाच्या सुरवातीपासून लसीकरणासंबंधी तयारी केली जात आहे. लसीकरणाचा प्राधान्यक्रमही ठरविण्यात आला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांत आधी लस देण्यात येईल, त्यासाठी मागविण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातून शासकीय व खासगी यंत्रणेतील सुमारे १३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्यात आली आहे.
लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, अधिकारी यांची माहिती केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाला मागितली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे माहिती संकलित करण्यात येत आहे. सुमारे १३ हजार डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, लॅब टेक्निशियन, असिस्टंट आदींची माहिती संकलित करण्यात आली आहे. लवकरच ती राज्य शासन व केंद्र सरकारकडे पाठविली जाणार आहे. कोरोनाचा जवळचा संबंध आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्वच घटकांशी येतो. यामुळे आरेाग्य क्षेत्रातील सर्वांना कोरोना लसीकरण अगोदर केले जाणार आहे.
जिल्हा रुग्णालयातर्फे अशी माहिती एकत्रितरीत्या संकलित करून ती संगणकावर भरली जात आहे. जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रासाठी किती लशी लागतील. याचा अंदाज घेतला जात आहे. अशीच माहिती केंद्र सरकारने राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना पाठविली आहे. राज्याची एकत्रित माहिती संकलित झाली की राज्यांना जिल्हानिहाय लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय आरोग्य अधिकारी, कर्मचारी डॉक्टर नर्सेस, इतर स्टाफची माहिती संकलित करण्यात येत आहे. बारा ते तेरा हजार जणांची माहिती संकलित होईल. ती राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला पाठविली जाईल. कोरोना लसीकरण अगोदर आरोग्य क्षेत्रातील संबंधितांना करण्यात येईल.
-डॉ. एन. सी. चव्हाण
जिल्हा शल्यचिकित्सक
संपादन- भूषण श्रीखंडे