वारे मनपा..आपला तो ‘रस्ता’ अन्‌ दुसऱ्यांचे ते खड्डे! 

सचिन जोशी
Tuesday, 12 January 2021

पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी प्रमुख रस्त्यांवर नागरी वस्त्यांमधील रस्तेही खोदण्यात आले; परंतु जलवाहिनी टाकल्यानंतर बहुतांश भागातील रस्त्यांची दुरुस्ती तात्पुरती करण्यात आली. त्यावर डांबर-खडीचे पॅचवर्क झाले नाही. 

जळगाव : ‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिनी व मलनिस्सारण प्रकल्पासाठी खोदकाम सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागतायत. दुसरीकडे भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या महापालिका इमारतीसमोरील रस्त्याची दोन-चार दिवसांत दुरुस्ती होती, तर अन्य भागातील रस्त्यांना दुरुस्तीसाठी अनेक महिने ताटकळत राहावे लागतेय. 
जळगाव शहरात अडीच-तीन वर्षांपासून ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे, तर गेल्या काही महिन्यांपासून त्यात भर पडून मलनिस्सारण योजनेचेही काम हाती घेण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी प्रमुख रस्त्यांवर नागरी वस्त्यांमधील रस्तेही खोदण्यात आले; परंतु जलवाहिनी टाकल्यानंतर बहुतांश भागातील रस्त्यांची दुरुस्ती तात्पुरती करण्यात आली. त्यावर डांबर-खडीचे पॅचवर्क झाले नाही. 

मुख्य रस्त्यांचीही चाळण 
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरही जलवाहिनी व भुयारी गटारांच्या कामासाठी खोदकाम सुरू झाले आहे. जलवाहिनीचे काम रस्त्याच्या एका बाजूने, तर भुयारी गटारांचे काम रस्त्याच्या अगदी मधोमध होत आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण खराब होत असून, त्याची तात्पुरती डागडुजी दोन्ही यंत्रणांकडून केली जात आहे. 

मक्तेदारांचे दुर्लक्ष 
खोदकाम झाल्यानंतर चाऱ्यांवरील पॅचवर्कचे काम पाणीपुरवठा योजनेचे मक्तेदार जैन इरिगेशन व मलनिस्सारण प्रकल्पाचे कंत्राटदार एल.सी. कन्स्ट्रक्शनने करावयाचे आहे; परंतु पॅचवर्कच्या कामासाठी दोन्ही मक्तेदार दुर्लक्ष करत आहेत. 

मनपाचा रस्ता तत्काळ तयार 
एकीकडे संपूर्ण शहरातील रस्त्यांची कमी-अधिक प्रमाणात बिकट स्थिती असताना महापालिका इमारतीसमोरील रस्ताही भुयारी गटाराच्या कामासाठी गेल्या आठवड्यात खोदण्यात आला. मात्र, हे काम पूर्ण होताच अगदी तीन-चार दिवसांत त्याचे डांबरीकरणासह पॅचवर्कही करण्यात आले. सोमवारी सकाळपासून या कामासाठी महापालिकेच्या वाहनांची यंत्रणा जुंपली. दुपारपर्यंत हा रस्ता पूर्ण दुरुस्त करण्यात आला. अगदी या रस्त्याला लागून नवी पेठेतील उपरस्ते असून, त्यांची दुरुस्ती मात्र करण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यांवर चिखल होऊन वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागल्याचे उदाहरण ताजे आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation amrut scheme road damage