जळगाव महिला रुग्णालयातील व्हेंटिलेटर खरेदीत घोळ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ventilator

जळगाव महिला रुग्णालयातील व्हेंटिलेटर खरेदीत घोळ?


जळगाव : मोहाडी येथील व्हेंटिलेटर खरेदी (Ventilator Shopping) करताना ते एका कंपनीचे दाखविण्यात आले होते. मात्र, पुरवठादाराने वेगळ्याच कंपनीचे व्हेंटिलेटर पुरविले असून, या खरेदीत घोळ झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) केली. पुरवठादार लक्ष्मी सर्जिकल्स, जिल्हा शल्यचिकित्सक, भांडारपाल यांची चौकशी करून कारवाईची मागणी भोळे यांनी निवेदनाद्वारे केली. विशेष म्हणजे भांडारपाल, विक्री प्रतिनिधी यांनी व्हेंटिलेटर दुसऱ्याच कंपनीचे असल्याचे लिहून दिले आहे.

हेही वाचा: कनेक्टिव्हिटी’चा ४० टक्के विद्यार्थ्यांना अडथळा!


मोहाडी महिला रुग्णालयात लहान मुलांसाठी १५ व मोठ्या रुग्णांसाठी १५ असे ३० व्हेंटिलेटर दाखल झाले आहेत. याबाबत भोळे यांनी माहिती अधिकारात माहिती मागतली असता, पुरवठादाराने नोंदणी करताना प्रोटान प्लस या मॉडेलचे नाव सांगितले आहे. मात्र, पुरवठा करताना ‘श्रेयांश’ नावाचे मॉडेल दिले आहे. सोबतच कंपनीने पुरविलेला सिरिअल नंबर व प्रत्यक्षातील सिरिअल नंबर वेगळा असून, तो हाताने लिहिला आहे. भांडारपाल मिलिंद काळे, जितेंद्र परदेशी, विक्री प्रतिनिधी घनश्‍याम पाटील यांनी याबाबत लेखी दिले आहे. यावरून या खरेदीत घोळ असल्याचे दिसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: पीकविम्याबाबत लवकरच कार्यवाही; केंद्रीय मंत्र्यांचे आश्‍वासन


व्हेंटिलेटर अतिउच्च दर्जाचे
याबाबत पुरवठादार लक्ष्मी सर्जिकल्स ॲन्ड फार्माचे संचालक सुनील खोना म्हणाले, की मोहाडी रुग्णालयात पुरविण्यात आलेले व्हेंटिलेटर अतिउच्च दर्जाचे, अतिरिक्त सुविधा असलेले आहेत. रुग्णालयास ज्या पद्धतीचे व्हेंटिलेटर हवे होते, त्याच्या अनेक पटीने उत्कृष्ट दर्जाचे आहे. ‘जीईएम’ पोर्टलवर ज्या कंपनीने कमी दराची निविदा भरली. त्याच कंपनीचे हे व्हेंटिलेटर आहे. केवळ कंपनी बदलली म्हणून त्यात घोळ झाला, असे म्हणता येणार नाही. जीईएम पोर्टलवर शासकीय साहित्याची खरेदी केली जाते. ते सर्वांसाठी ओपन असते. मॅक्स ब्रॅन्ड प्रोकान प्लसचे व्हेंटिलेटर असायला हवे होते. मात्र त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाच्या हमीसह श्रीयश ९०० ब्रॅन्डचे व्हेंटिलेटर पुरविण्यात आले आहे. नियम व अटीनुसार त्याचा पुरवठा करण्यात आला आहे.


कंपनीला नोटीस
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले, की पुरवठादार लक्ष्मी सर्जिकल्स ॲन्ड फार्माला व्हेंटिलेटरचे पेमेंट देणे अद्याप बाकी आहे. मॉडेलची कंपनी बदलली, सिरिअल क्रमांकाबाबत नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करू.

Web Title: Marathi News Jalgaon Corruption In Purchase Ventilator In Womens Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..