बोंडअळीचे संकट गडद; कपाशी उद्ध्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

कपाशीच्या कैऱ्यांना मोठ्या प्रमाणात बोंडअळीने कीड लागल्याने बोंडातून कपाशीच फुटत नसल्याचे चित्र असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भावामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कित्येक हेक्टर कपाशीची शेतं अक्षरशः नांगरुन टाकलेली आहेत.

साकळी (ता. यावल) : येथील परिसरातील कपाशी पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले असून, बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. कोरडवाहूसह विहिरीच्या पाण्यावर लावलेल्या कपाशीच्या कैऱ्यांना मोठ्या प्रमाणात बोंडअळीने कीड लागल्याने बोंडातून कपाशीच फुटत नसल्याचे चित्र असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भावामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कित्येक हेक्टर कपाशीची शेतं अक्षरशः नांगरुन टाकलेली आहेत. शासन स्तरावरून लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. 
साकळीसह परिसरात सततच्या पावसाने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. बोंडातून बाहेर आलेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, कापसाचा सडा शेतशिवारात पडला आहे. त्यातच कपाशीची बोंडे सडली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यातच सध्या उरल्यासुरल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने बोंडातून कपाशी फुटणेही कठीण झाले आहे. त्यामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे धोक्यात आले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. हजारो रुपये खर्च करून हाती काही येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काळजीची बनली आहे. आता घरखर्च कसा करायचा, रब्बी हंगामाचा खर्च कोठून करायचा, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. 

कैऱ्यांना कापूसच फुटेना 
आतापर्यंत केलेला मोठा खर्च व भरपूर कष्ट करून उभ्या केलेल्या कोरडवाहू कपाशीचे पीक महिन्याभरापूर्वी समाधानकारक होते. मात्र आता या कपाशीच्या शेतात मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने हे पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे तर आता कपाशी झाडाच्या कैऱ्यांमधून कपाशीच फुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची चिंता वाढली आहे. आतापर्यंत या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात एका बिघ्याला अवघी दोन-चार किलो कपाशी निघाली असल्याने कपाशी पिकाची स्थिती अतिशय विदारक बनलेली आहे. 

त्वरित पंचनामे करा 
बोंडआळी आल्याने कापसाच्या कैऱ्या सडून झाडाला कापूसच फूटत नसल्याने लावलेला खर्चही वसूल होत नसल्याची शक्यता वाढल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उभी कपाशी अक्षरशः नांगरली आहे. शासनस्तरावरून सरसकट पंचनामे करण्यात यावे, शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cotton bondali crisis is dark in farmer