esakal | जिल्हा रुग्णालयातील बेड ‘ऑक्सिजन’ने परिपूर्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon medical collage

कोविड रुग्णालयातील व्यवस्थेत टप्प्याटप्प्याने सुधार केला जात आहे. बेड, ऑक्सिजनची सुविधा, व्हेंटिलेटर्स आदी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे त्यासाठी पूर्ण सहकार्य मिळत असून, कोरोनाविरोधात लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

जिल्हा रुग्णालयातील बेड ‘ऑक्सिजन’ने परिपूर्ण 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : गेल्या महिन्यात जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात वृद्धेचा शौचालयात मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा टीकेची धनी ठरली होती. त्यानंतर नव्या डीनसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात काही दिवसांतच आमूलाग्र बदल झाले. 
वृद्धेच्या मृत्यूनंतर तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे निलंबन झाले. त्या जागी नवे डीन म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या मदतीला १६ वैद्यकीय अधिकारी व अन्य स्टाफची टीम देण्यात आली. डॉ. रामानंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यवस्थेत काही आमूलाग्र बदल करणे सुरू केले. 

सर्व बेड ऑक्सिजनयुक्त 
जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षाची क्षमता ३११ बेडपर्यंत वाढविली आहे. सुरवातीला केवळ १५० बेड होते. त्यांपैकी केवळ ५० बेडना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा होती. आता ते वाढून सर्व ३११ बेडपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा सज्ज आहे. सद्य:स्थितीत हे रुग्णालय फुल्ल आहे. कोविड कक्षांमध्ये ३०८ रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी २२८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. 

व्हेंटिलेटर्सही उपलब्ध 
कोविड रुग्णालय म्हणून जाहीर झाल्यानंतर या रुग्णालयात केवळ सहा व्हेंटिलेटर्स होती. ती संख्या आता ७१ पर्यंत वाढविली आहे. कोविड कक्षात केवळ ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर १२६ रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. 

आणखी ७५ बेड डॉ. पाटील रुग्णालयात 
जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून, त्यामुळे गंभीर रुग्णांची व्यवस्था करणेही जिकिरीचे झाले आहे. सध्या कोविड रुग्णालय म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ४०० बेड आरक्षित असून, १५० बेडचा वापर केला जात आहे. आणखी ७५ बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. तेथे नोडल अधिकारी म्हणून डॉ. वैभव सोनार यांची नियुक्ती झाली असून, त्यांना संबंधित नर्सिंग स्टाफ दिला आहे. 
 

loading image