
जिल्ह्यात गेल्या एक ते दीड महिन्यात अचानक कोरोनाबाधित रुग्ण वाढले होते. त्यातील बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. शहरासह जिल्ह्यात सुमारे ७०० ते ८०० ऑक्सिजन सिलिंडर लागत होती. त्यामानाने जिल्ह्याला पुरवठा कमी होत होता.
जळगाव : जिल्हा शासकीय व वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी २० किलोलिटरची ऑक्सिजन टँक बनविण्यात येत आहे. यामुळे एक हजार ऑक्सिजन सिलिंडरची बचत यामुळे होणार आहे.
जिल्ह्यात गेल्या एक ते दीड महिन्यात अचानक कोरोनाबाधित रुग्ण वाढले होते. त्यातील बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. शहरासह जिल्ह्यात सुमारे ७०० ते ८०० ऑक्सिजन सिलिंडर लागत होती. त्यामानाने जिल्ह्याला पुरवठा कमी होत होता. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सिजन केवळ जिल्ह्यातील रुग्णांसाठी व एमआयडीसीसाठीच वापरावा, इतर ठिकाणी पाठवू नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची नियुक्ती केली होती. यामुळे कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजनचा जिल्हा कोविड रुग्णालयासह खासगी रुग्णालयात पुरवठा झाला.
खासगी रुग्णालयांनाही सक्त ताकीद देण्यात आली होती, की ऑक्सिजनचा साठा करून ठेवू नका. रोज किंवा आगामी काही दिवसांत किती ऑक्सिजन सिलिंडर लागणार आहेत त्याबाबत लेखाजोखा ठेवण्यास सांगितले होते. कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण आहेत, त्यांपैकी किती जणांना ऑक्सिजन लागलेला आहे, किती ऑक्सिजन शिल्लक आहे याचा अहवाल रोज जिल्हाधिकारी घेत होते.
२० किमी टँकचे काम
रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची गरज लक्षात घेता जळगावला ऑक्सिजनचा टँक सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. तो मंजूर झाल्याने तीन वेळा ऑक्सिजन टँक बांधण्यासाठी निविदा निघाल्या. आता २० किलोलिटर ऑक्सिजन टँकचे काम सुरू आहे. येत्या आठ दिवसांत टँकचे काम पूर्ण होईल. लिक्विड स्वरूपात ऑक्सिजन तयार करून तो पाइपलाइनद्वारे रुग्णांच्या बेडपर्यंत पुरविला जाणार आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन टँक तयार करण्याचे काम सुरू आहे. आठ दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. टँकची क्षमता २० किलोलिटर आहे. एक हजार सिलिंडरची बचत यामुळे होणार आहे. ऑक्सिजनचा तुटवडा यापुढे जाणवणार नाही.
- डॉ. एन. सी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
संपादन ः राजेश सोनवणे