esakal | ते गेले पण त्‍यांच्या नावाचा वापर; डॉ. सुपेकरांच्या नावे ५० हजारांची लूट
sakal

बोलून बातमी शोधा

Jalindar supekar

ते गेले पण त्‍यांच्या नावाचा वापर; डॉ. सुपेकरांच्या नावे ५० हजारांची लूट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : पोलिस अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते हायजॅक (cyber crime) करून संपर्कातील लोकांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार समोर येत असताना, आता चक्क पुण्याचे पोलिस उपायुक्त तथा जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर (Police officer Jalindar supekar) यांचे बनावट खाते तयार करून त्यांच्या मित्राकडून ५० हजारांत गंडविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (jalgaon-crime-news-cyber-crime-fake-Facebook-account-police-officer-Jalindar-supekar)

सोशल मीडियाच्या (Social media fake facebook account) गैरवापरातून ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन आर्थिक लूटमारीसह फसवणुकीचे अनेक गुन्हे रोज घडत आहेत. त्यातीलच फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्याद्वारे संबंधित व्यक्तीच्या मित्रांना पैशांची मागणी करणे, अश्‍लील फोटो, व्हिडिओ तयार करून शेअर करण्याची धमकी देत लाखो रुपये खंडणी स्वरूपात उकळण्याचे नवे उद्योगही फोफावत असल्याने सायबर पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.

५० हजारांना गंडवले

असाच प्रकार जळगावला पोलिस अधीक्षक राहिलेले डॉ. जालिंदर सुपेकर (Jalindar supekar) यांच्याबाबतीत घडला आहे. डॉ. सुपेकर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते तयार केले. त्यात या व्यक्तीने त्यांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. या रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. पुण्यातील व्यापारी असलेल्या मित्राने खरंच पैशाची गरज असेल म्हणून ५० हजार रुपये ऑनलाइन पाठविले.

पुण्यात गुन्हा दाखल

सुपेकर यांनी त्याची दखल घेऊन शिवाजीनगर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून हे खाते ब्लॉक केले. हे खाते फेक असून, कोणीही यावर पैशांचा व्यवहार करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तोरपर्यंत त्यांचा हा मेसेज बघितल्यानंतर ज्या मित्राने ५० हजार रुपये पाठविले, त्यांनी डॉ. सुपेकर यांच्याशी संपर्क केला व आपण ५० हजार पाठविल्याचे त्यांना सांगितले. सुपेकर यांनी तातडीने सूत्र हलविल्यानंतर नऊ हजार रुपयांचा व्यवहार रोखण्यात यश आले.

..यांच्या बाबतीतही घटना

अप्पपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, लोहीत मतानी, निरीक्षक बी. के. कंजे, सहाय्यक निरीक्षक दिलीप पाटील, रामानंदचे सहाय्यक निरीक्षक परदेशी, अशा पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक खाते तयार करून त्यांच्या ओळखीच्या मित्रांनाच गंडविण्याचा प्रयत्न झाला आहे.

संशयितांना अटक करणार

घडलेल्या प्रकारात गुन्ह्याची नोंद करून सायबरतज्ज्ञ संशयितांचा शोध घेत आहेत. एक टीम मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांच्या मागावर निघाली असून, त्यांना लवकरच अटक करू, अशी माहिती डॉ. सुपेकर यांनी ‘सकाळ’शी बोलतांना दिली.