esakal | एका ताटातच सोबत जेवली..भांडी घासली अन् गप्पा करता करताच‌ घात

बोलून बातमी शोधा

jalgaon murder case
एका ताटातच सोबत जेवली..भांडी घासली अन् गप्पा करता करताच‌ घात
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : मृत आशाबाई पाटील ही अरुणाबाई व देवीदास या दोघांच्या माध्यमातून व्याजाचा धंदा चालवत होती. अचानक बेपत्ता असलेली अरुणाबाई देवीदाससोबत त्या रात्री घरी आली. मृतासह एका ताटात जेवली..भांडी घासू लागली..दोघे बोलत असताना देवीदासने मागून येत दोरीने तिचा गळा आवळला..खाली पाडल्यावर अरुणाने आशाबाईच्या तोंडावर उशी ठेवून श्‍वास रोखल्याचे तिने कबुली जबाबात म्हटलेय.

कुसुंब्यातील दांपत्याच्या घटनेने गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत तिघांना अटक केली. अटकेतील अरुणाबाई गजानन वारंगे (वय ३०) सोबत देवीदास नामदेव श्रीनाथ यांचे प्रेमसंबंध आहेत. दुसरा संशयित सुधाकर रामलाल पाटील याचे चंद्रकलाबाई सुभाष धनगर हिच्याशी संबंध. या चौकडीत आशाबाईचे अरुणाकडे ११ लाख व त्याचे व्याज येणे होते. चंद्रकलानेही व्याजाने पैसे घेतले होते.

या रागातून रचला कट

पैसे देत नाही म्हणून चंद्रकलाबाईला घरात बोलावून आशाबाईने मारझोड केली होती. त्याच वेळी देवीदासचा पाणउताराही केला होता. अशातच अरुणाबाई व जिलबीवाला देवीदास याने शांत डोक्याने खुनाचा कट रचला. सुधाकरला पैशांची गरज असल्याने त्याला गुन्ह्यात सामील करून घेत, गुन्ह्यातील सोने, रोख रकमेत वाटेकरी केले.

असा झाला उलगडा

मृत आशाबाईच्या हातातील एकही बांगडी फुटली नाही. अंगातील गाऊन अन्‌ मृतावस्थेतही ओढणी अंगावर होती. त्यावरून यात महिलेचा सहभाग असावा किंवा चहात गुंगीचे औषध टाकून कटाचा संशय आला. संपर्कातील प्रत्येकालाच चौकशीसाठी पोलिस बोलवत असताना घटनेच्या दिवसापासून चंद्रकलाबाईचा मोबाईल बंद होता. त्यातून खुनाचा उलगडा झाला.

..तरी दया होतीच

आशाबाईने चंद्रकलाबाईला मारझोड केली होती. तिच्याकडे जेवणावर सुधाकर, अरुणा व देवीदास यांनी मारून टाकण्याचा प्लॅन बोलून दाखविला. पण चंद्रकलाबाईचा आशाबाईला थेट मारून टाकण्यास विरोध होता. म्हणून उर्वरित तिघांनी तिला त्या दिवशी नेले नाही.

एकाच वेळी तिघांना अटक

पुराव्यांची खात्री झाल्यावर सर्वांत अधी सुधाकर पाटील याला पोलिसांनी त्याच्या घरून, तर दुसऱ्या पथकाने अरुणाबाई आणि देवीदास जिलबीवाला याला ताब्यात घेतले. खातरजमा करायला चंद्रकलाही आली. समोरासमोर येताच संशयितांनी गुन्हा कबूल करत घटनाक्रम सांगितला.

सुधाकर करणार होता आत्महत्या

खुनाच्या घटनेनंतर सुधाकरला रात्री झोप लागत नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्याने फवारणीच्या विषारी द्रवाची बाटली आणून ठेवली होती. सोमवारीच (ता. २६) शेतात तो आत्महत्या करणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तत्पूर्वीच गुन्हा उघड होऊन त्याला अटक झाली.

असा घटनाक्रम

संतोष पाटील शेगडी घेऊन गेला - ९ः४५

अरुणाबाई व देवीदास घरी आले - ९ः५०

मृत अरुणाबाईचे जेवण व चर्चा - १०ः००

सुधाकर आशाबाईच्या घरी आला - १०ः१०

देवीदास व सुधाकर दोघेही गच्चीवर - १०ः२०

गच्चीवर मुरलीधरचा खून - १०ः४५

थोडा वेळ थांबून दोघे खाली आले - ११ः००

आशाबाईचा खुर्चीवर गळा आवळला - ११ः१०

अंगावरील व कपाटातील सोने काढले - ११ः३०

एकामागून एक तिघेही घराबाहेर पडले - १२ः१०