esakal | रानभाज्यांचे गुणधर्म जळगावकरांच्या पचनी 
sakal

बोलून बातमी शोधा

रानभाज्यांचे गुणधर्म जळगावकरांच्या पचनी 

पौष्टिक व जीवनसत्त्वयुक्त असलेल्या रानभाज्या कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वरदान ठरणार असल्याने प्रत्येकाने आठवड्यात किमान दोनवेळा रानभाज्यांचा आहारात समावेश करावा.

रानभाज्यांचे गुणधर्म जळगावकरांच्या पचनी 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : रानभाज्यांकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. अनेकांना रानभाज्या कशा ओळखाव्यात, याची माहिती नसते. काहींना त्यांचे औषधीयुक्त गुणधर्म माहीत नसतात. मात्र, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने रविवारी (ता. ९) रानभाजी महोत्सव भरवून जळगावकरांना रानभाज्या पाहण्याची संधीच नव्हे, तर त्याच्या औषधीयुक्त गुणधर्माची माहिती दिली. भाज्यांचे गुणधर्म पाहून भाजी महोत्सवाला आलेल्या नागरिकांनी अधिक जागृत होत लागलीच रानभाज्यांची खरेदी केली. सोबतच रानभाज्या रोज कोठे मिळतील, याचीही माहिती घेतली. यापुढे रानभाज्या घेऊन व्याधी पळवू, असा अनेकांनी संकल्पही केला. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे रोटरी क्लबमध्ये रानभाजी महोत्सव झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महोत्सवाचे उद्‌घाटन केले. ते म्हणाले, की पौष्टिक व जीवनसत्त्वयुक्त असलेल्या रानभाज्या कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वरदान ठरणार असल्याने प्रत्येकाने आठवड्यात किमान दोनवेळा रानभाज्यांचा आहारात समावेश करावा. आरोग्याच्यादृष्टीने रानभाज्यांना आहारात महत्त्व आहे. आठवड्यातील एक दिवस शहरात रानभाज्यांचा बाजार भरविण्याची सूचना मी कृषी विभागाला करतो. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, रोटरीचे प्रकल्पप्रमुख योगेश भोळे आदी उपस्थित होते. 

श्री. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. उमेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या ‘रानभाजी’ या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. आहारतज्ज्ञ डॉ. अनंत पाटील यांनी रानभाज्यांचे महत्त्व सांगितले. डॉ. मनोजकुमार चोपडा यांनी रानभाज्यांचे औषधी उपयोग सांगितले. कावेरी राजपूत व सारिता खाचणे यांनी सूत्रसंचालन केले. ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी यांनी आभार मानले. 


५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, रोटरीचे अध्यक्ष तुषार चित्ते, केकल पटेल आदी उपस्थित होते. 

महोत्सवातील रानभाज्या 
कच्चे उंबर, चिघूर, भोकर आघाडा, फांग, कस्टोली, चिवई, अंबाडी, कोहीली, भुई आवळा, रानमाठा, पुनर्नवा, राजगीरा, सराटा, केळफूल, पाथरी, हादगा, डिंगऱ्या, डिऱ्या, शेवगा, रानभेंडी, दोडी फुले, शंदोडी, तांदळूसा, चिंचेचा पाला, रोयसा गवत, गवतीचहा आदी. 

रानात फिरून रानभाज्या आणल्या आहेत. ग्राहकांना रानभाज्यांचे औषधी गुणधर्मही आम्ही सांगतो. यामुळे भाज्या विकल्या जात आहेत. असा महोत्सव दर आठवड्याला भरविला जावा. रानभाज्यांमुळे प्रतिकारशक्ती चांगली व आरोग्य निरोगी राहते. 
-अमर काटोले, भाजीविक्रेता  

संपादन- भूषण श्रीखंडे