esakal | धरणगाव तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

धरणगाव तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 

धरणगाव तालुक्यात तर आजमितीस केवळ एक ॲक्टिव रुग्ण असून हा तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोचला आहे.

धरणगाव तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये मंगळवारी (ता.१७) एकही रुग्ण आढळून आला नाही. धरणगाव तालुक्यात आता एकमेव ॲक्टिव रुग्ण असल्याने हा तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचे मानले जात आहे. मात्र, रुग्ण कमी आढळत असताना कोरोना बाधितांचे मृत्यू थांबू शकलेले नाही. 


जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सौम्य झाला आहे. दररोज रुग्ण आढळण्याची संख्या पन्नाशीच्या आत राहिल्याने एकूण रुग्णसंख्या फारशी वाढत नसून बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने ॲक्टिव रुग्ण कमी होत आहेत. सोमवारी व मंगळवारी असे दोन दिवस प्रत्येकी ३२ असे ६४ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ८४२ वर पोचली आहे. मंगळवारी दिवसभरात ४१ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांचा एकूण आकडा ५२ हजार १७९ वर पोचला आहे. एकीकडे रुग्ण कमी होत असताना मृत्यू मात्र थांबत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी व मंगळवारी प्रत्येकी २ असे ४ बळी गेल्याने कोरोनामुळे आत्तापर्यंत बळींची संख्या १२८० झाली आहे. 

काही तालुके कोरोनामुक्तीकडे 
जिल्ह्यात जळगाव शहर व भुसावळ तालुक्यात दररोज रुग्ण आढळून येत असताना हॉटस्पॉट ठरलेल्या धरणगाव, भडगाव, रावेर, चाळीसगाव, पारोळा आदी तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. धरणगाव तालुक्यात तर आजमितीस केवळ एक ॲक्टिव रुग्ण असून हा तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोचला आहे. भडगाव ४, रावेर ५, चाळीसगाव व पाचोरा तालुक्यात प्रत्येकी केवळ ७ ॲक्टिव रुग्ण राहिलेत. दुसरीकडे जळगाव शहरात नव्याने १० तर भुसावळला ९ रुग्ण आढळून आले असून या शहरांमधील रुग्णसंख्या वाढतच आहे. 

चाचण्यांची संख्या अल्प 
दिवाळीनिमित्त उत्सवाचे दिवस असल्याने संशयित रुग्णांनी चाचण्यांकडे पाठ फिरवली आहे. चार दिवसांपासून दररोज चाचण्यांची संख्या रोडावत असून मंगळवारी प्राप्त अहवालातही केवळ ९०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात आरटीपीआर चाचण्यांची संख्या ५५ एवढी अल्प होती. 

संपादन- भूषण श्रीखंंडे