पंतप्रधानांना पत्र पाठवूनही कर्ज नाही..अठराविश्‍व गरिबी, वृद्ध आई, आजारी भाऊ अन्‌ जन्मतः अपंगत्‍व

प्रकाश चौधरी
Thursday, 3 December 2020

वयाची चाळिशी पार केलेली व्यक्ती गोकुळ उत्तम पाटील जन्मत:च दिव्यांग आहेत. त्यांना शासनाच्या नोंदीनुसार ६० टक्के अपंगत्व आहे. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले असून, शारीरिक अपंगत्वामुळे कुठलेही मोलमजुरीची काम होत नसल्याने सध्या ते बेरोजगार आहेत.

चुंचाळे (ता. यावल) : जन्मताच आलेले अपंगत्व... घरात वृद्ध आई... आजाराने त्रस्त भाऊ... असे त्रिकोणी कुटुंब... कुटुंबात अठराविश्व गरिबी... कोणासही रोजगार नाही... उदरनिर्वाह चालवावा कसा, असा बिकट प्रश्न... गल्लीतील ग्रामपंचायतीपासून तर थेट दिल्लीपर्यंत राष्ट्रपतींकडे त्यांनी ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी पत्र पाठविले. नोकरी किंवा कुठल्याही योजनेत कर्ज मिळावे म्हणून मागणी केली. पण वयाची चाळिशी उलटल्यानंतही त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. 
येथील रहिवासी असलेले व वयाची चाळिशी पार केलेली व्यक्ती गोकुळ उत्तम पाटील जन्मत:च दिव्यांग आहेत. त्यांना शासनाच्या नोंदीनुसार ६० टक्के अपंगत्व आहे. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले असून, शारीरिक अपंगत्वामुळे कुठलेही मोलमजुरीची काम होत नसल्याने सध्या ते बेरोजगार आहेत. त्यांची वयोवृद्ध आई, गंभीर आजाराने ग्रस्त लहान भाऊ, कुटुंबातील सर्वच व्यक्ती बेरोजगार असल्याने त्यांना नित्याचे जीवन जगणेही फार कठीण बनले आहे. 
दिव्यांग गोकुळ पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालावा, यासाठी राज्यकर्ते व प्रशासन यांच्याकडे शासकीय नोकरी द्या अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज मंजूर करावे, या मागणीसाठी निवेदन दिलेले आहे. मात्र, अद्याप कोणीही या निवेदनाची दखल घेतलेली नाही अथवा कोणत्याही राज्यकर्त्याला गोकुळ पाटील यांना कोणत्याही स्वरूपात मदतीचा हात द्यावा असे वाटले नाही. उलट त्यांच्या निवेदनाकडे सर्वांनीच पाठ फिरविली आहे. 

पंतप्रधान मोदींनाही पत्र
त्यांनी ८ ऑक्टोबर २०१८ ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह अनेक अनेकांना पत्रे पाठवून व्यवसायासाठी कर्ज मिळण्याची मागणी केली. मात्र, दीनदुबळे, वंचितांसाठी सरकारच्या पंतप्रधान मुद्रा योजना, पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजना, सुशिक्षित बेरोजगार योजना, प्रधानमंत्री दिव्यांग योजना अशा अनेक दिव्यांग-अपंगांसाठी योजना आहे. या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा मला लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. यानंतर पाटील यांनी पुन्हा १३ जानेवारी व १७ नोव्हेंबर २०२० अशा दोन वेळा राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री या सर्वांसह अनेक राज्यकर्त्यांना पत्र पाठवून ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी मदतीची याचना केली. मात्र दुर्दैवाने व राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे दिव्यांग गोकुळ आजपर्यंत ‘आत्मनिर्भर’ बनू शकले नाहीत. 

दिल्लीपासून गल्लीपर्यंत हेळसांड 
गोकुळ पाटील यांच्या अपंगत्वाची थेट दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कशी हेडसांड होत आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे त्यांना स्वतःच्या गावातील संबंधित चुंचाळे ग्रामपंचायतीनेदेखील अपंग निधींतर्गत आजपर्यंत कुठलीही मदत दिलेली नाही. तसेच दिव्यांग अपंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या यंत्रणेनेही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon disabled person pm modi later in loan but no responce