आदिवासी गावांमध्ये वनसंवर्धनातून रोजगारनिर्मितीसाठी लवकरच आराखडा तयार होणार 

देविदास वाणी
Wednesday, 30 September 2020

वनहक्क कायदा-२००८ नुसार सामूहिक वनहक्क प्रदान करण्यात आलेल्या गावांमध्ये मिळालेल्या सामूहिक वनक्षेत्राचे व्यवस्थापन व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृती आराखडे तयार करण्यासाठी लोकसमन्वय प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहे.

जळगाव ः यावल अभयारण्य क्षेत्रातील गावे, चोपडा परिसरातील आदिवासी गावांमध्ये वनसंवर्धन व त्यातून रोजगारनिर्मितीवर भर द्यावयाचा आहे. ज्यातून या गावांमध्ये लोकांची उपजीविका व जीवनमान उंचावता येईल. यासाठी असा कृती आराखडा तयार करा की सर्व विभागांच्या योजना येथे राबविता येतील व नागरिकांचे जीवनमान उंचावता येईल, यासाठीचा कृती आराखडा लवकरच तयार करून सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केल्या आहे. 

जिल्ह्यातील सामुदायिक वनाधिकार प्राप्त गावांमधील वनव्यवस्थापन व संवर्धन कृती आराखडे तयार करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वनहक्क जिल्हा कन्व्हर्जन समितीची आढावा बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपवनसंरक्षक होशिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते आदी अधिकाऱ्यांसह लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, लोकसमन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन उपस्थित होते. 

वनहक्क कायदा-२००८ नुसार सामूहिक वनहक्क प्रदान करण्यात आलेल्या गावांमध्ये मिळालेल्या सामूहिक वनक्षेत्राचे व्यवस्थापन व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृती आराखडे तयार करण्यासाठी लोकसमन्वय प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या १८ गावांमध्ये गावसमित्या तयार करून कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबतीत अध्यक्षा शिंदे यांनी मांडणी केली. 

यावेळी यावल अभयारण्य क्षेत्रातील गावे, चोपडा परिसरातील आदिवासी गावांमध्ये वनसंवर्धन व त्यातून रोजगारनिर्मितीवर भर द्यावा लागेल. ज्यातून या गावांमध्ये लोकांची उपजीविका व जीवनमान उंचावता येईल म्हणून या कृती आराखड्यात सर्व विभागांच्या योजनांचा समन्वय करून विकासकामे करता येतील. स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे रक्षण व संवर्धनही होईल, असे सांगत सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला प्रकाश बारेला, ताराचंद पावरा, इरफान तडवी उपस्थित होते. 

ही प्रक्रिया लोकांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने शासकीय यंत्रणेने आपापल्या विभागांच्या योजनांच्या समन्वयातून या भागात नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवून चांगल्या पद्धतीने योजना राबवूया. त्यासाठी पुढील बैठकीत सर्व विभाग आणि गाव व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district administration will soon prepare a plan for employment generation from forestry in tribal villages