शेतकऱ्यांना मिळत नाहीत हक्काचे पैसे; जिल्हा मध्यवर्ती बँकेत खळखळाट 

रोहिदास मोरे
Monday, 26 October 2020

जिल्‍हा मध्यवर्ती बँकेच्या आज ही बऱ्याच शाखांचे व्यवहार जुनाट पध्दतीने सुरू आहेत. अनेक गावांच्या शाखा वेळेवर उघडत नाहीत. बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकांशी व्यवस्थित बोलावे. यासाठी शिकवणी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

अडावद (जळगाव) : जिल्हा मध्यवर्ती बँक आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे बँकेचे ब्रीद असले तरी सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना हिनवणारी असाच आजपर्यंतचा बँकेचा अनुभव असल्‍याचे ग्राहक म्‍हणत आहेत. बँकेच्या कारभारात अनेकदा खांदे पालट झाले; तरी ही जिल्हा बँकेने कात टाकली नाही. तसेच अद्यापही आधुनिकतेची कास धरली नाही. 

जिल्‍हा मध्यवर्ती बँकेच्या आज ही बऱ्याच शाखांचे व्यवहार जुनाट पध्दतीने सुरू आहेत. अनेक गावांच्या शाखा वेळेवर उघडत नाहीत. बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकांशी व्यवस्थित बोलावे. यासाठी शिकवणी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अज्ञानी मजूर, शेतकरी ग्राहकांची नेहमीच बँकेत हेळसांड होते. या शाखांमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा ग्राहकांसाठी नाही. नवीन एटीएम, पासबुक, चेकबुकचे तर सोडाच पण महिने महिने पासबुक भरून मिळत नाही. नेहमीप्रमाणे ठरलेले उत्तर मशीन खराब आहे. 

शेतकऱ्यांना माराव्या लागतात चकरा
चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथील बँकेच्या भोंगळ कारभार समोर आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे काढण्यासाठी शेतीचे कामे सोडून बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. बँकेत आलेल्या शेतकऱ्यांशी आरेरावीची भाषा वापरली जात आहे.
तालुक्यात निमगव्हाण येथे जेडीसीसी बँकेची शाखा आहे. परिसरातील शेतकऱ्यांची खाती येथील बँकेत आहेत. आजूबाजूच्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून येथे शेतकरी येत असतात. निमगव्हाण येथील जेडीसीसीच्या शाखेत नेहमीच बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली असते. बँकेत पैसे असलेल्या खातेदारांना पैसे मिळत नाही; त्यामुळे जिल्हा बँकेच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर येताना दिसतो. 

पैसे असताना देण्यास नकार
निमगव्हाण येथील बँकेत गावापासून लांब दहा ते पंधरा किमी अंतरावरील शेतकरी, महिला, सरकारी कर्मचारी, अपंग व्यक्ती नागरिकांचे खाते असून या बँकेत वारंवार पैशाच्या कारणावरून वाद होत असतात. खात्यात पैसे शिल्लक असूनही मागितलेली रक्कम खातेदारांना मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहे.सकाळी बँक उघडल्यावर बँकेच्या प्रशासनाकडून कोरोना संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल न घेता व्यवहार सुरू करण्यात येतात. सद्या बँकेत पीक विम्याचे पैसे जमा झाल्याने खातेदारांची बँकेत एकाच वेळी झुबंड उडालेली दिसत असताना एका कर्मचाऱ्याची नियुक्ती शिस्त लावण्यासाठी केली पाहिजे. पण तेवढे ही भान इथल्या कर्मचाऱ्यांना नाही.

असा आहे एक अनुभव
चोपडा तालुक्‍यात तालुक्यातील सनपुले येथील शेतकरी बँकेत गेले असता ४५ हजाराची गरज असतांना वीस हजार रुपये मिळतील; ते घायचे असतील तर घ्या..असे बँकेकडून सांगण्यात आले. त्या शेतकऱ्यांने विनंती केली की माझे वडील दवाखान्यात आहेत; त्यांना अर्जंट ४५ हजार रुपये औषधीसाठी लागणार आहेत. ते मला आताच ऍडजस्ट करून द्या. पण दुपारी या संध्याकाळी या अशी उत्तरे येथील कर्मचाऱ्यांकडून दिली गेली. तसे पाहता या शेतकऱ्याची बँकेत तिसरी फेरी होती. अतिशय वाईट अवस्था जिल्हा बँकेच्या शाखेची झालेली आहे. पण बँकेत पैसे शिल्लक नाहीत शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाल्याने बँकेत गर्दी आहे. तसेच वरून वीस लाख रुपयांची मागणी केली तर फक्त पाच लाख रुपये उपलब्ध होतात. त्यामुळे प्रत्येक खातेदारास फक्त वीस हजार रुपये आम्ही एका वेळी देऊ शकत असल्‍याचे शाखा व्यवस्‍थापक यांच्याकडून सांगण्यात आले.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district bank not payment available farmer