होम क्वारंटाइनचे अधिकार तहसीलदारांना : जिल्हाधिकारी राऊत 

abhijit raut
abhijit raut

जळगाव : कोरोनाची लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन करायचे असल्यास हे अधिकार तहसीलदारांनाच देण्यात आले आहेत. होम क्वारंटाइन करायचे झाल्यास संबंधितांच्या घरची परिस्थिती शासकीय निकषात बसत असेल, तर त्या परिस्थितीनुसार होम क्वारंटाइनची परवानगी देण्यात यावी, असे आदेश अभिजित राऊत यांनी शुक्रवारी (ता. 10) दिले. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांतर्गत विविध विषयांसंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. या वेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की कोरोना रुग्णांचे अहवाल लवकर येण्यासाठी ऍन्टिजन किटद्वारे टेस्ट करण्यावर भर राहणार आहे. मात्र हे करीत असताना ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांचीच या किटद्वारे तपासणी करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. लक्षणे असलेल्या रुग्णांची या किटद्वारे तपासणी केली तरी त्यांची पुन्हा स्वॅब घेऊन तपासणी करावीच लागते. त्यामुळे लक्षणे नसलेल्यांचीच याद्वारे तपासणी केली जाणार आहे. यातून अहवाल लवकर येईल व रुग्णालयांमधील गर्दी कमी होऊन ताणही कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की कोरोनाच्या लढ्यात जे डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची ऍन्टिजन किटद्वारे तपासणी करण्यावरही भर राहणार आहे. याद्वारे अहवाल तत्काळ येईल व संबंधित व्यक्ती निगेटिव्ह आल्यास त्याची पुन्हा कोरोनाच्या लढ्यात मदत होऊ शकणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे स्वॅब घेण्याची सूचना करीत त्यांच्या नोंद ठेवण्याचे सांगितले. 

जिल्हाभरात ऑक्‍सिजन सुविधेवर भर 
जिल्ह्यात 12 ठिकाणी प्रत्येकी 50 याप्रमाणे एकूण 600 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत असून, यामध्ये चोपडा उपजिल्हा रुग्णालयात कामही पूर्ण झाले आहे. लोकसहभागातून ही कामे होण्यासाठीही आवाहन करण्यात येत असून, त्यास प्रतिसाद मिळत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले. चोपडा येथे हे काम पूर्ण झाले असून, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड व इतर ठिकाणीही हे काम हाती घेण्यात येणार आहे. चोपडा येथील ऑक्‍सिजन पाइपलाइन सुरू झाली असून, पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्‍सिजन पाइपलाइनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यासाठी विविध दानशूर व्यक्ती तसेच पाचोरा तालुका राजपत्रित अधिकारी महासंघ, महसूल कर्मचारी संघटना यांनी मदत केली. अमळनेर येथील काम शनिवारी सुरू होईल. भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्‍सिजन पाइपलाइनचे साहित्य उपलब्ध झाले असून, तेथील कामदेखील 12 जुलैपासून सुरू होणार आहे. 

कोरोनाच्या संकटात सरसावले दानशूरांचे हात 
चोपडा येथे ऑक्‍सिजन पाइपलाइन, एक एक्‍स-रे मशिन, दोन ऑक्‍सिजन कॉन्सेट्रेटर, दोन जलशुद्धीकरण यंत्र, 100 खाटा, अमळनेर येथे ऑक्‍सिजन पाइपलाइन, दोन एक्‍स-रे मशिन, एक व्हेंटिलेटर, सहा पॅरामॉनिटर्स, दोन हजार 500 पीपीई किट, 1600 एन-95 मास्क, जलशुद्धीकरण यंत्र, 100 खाटा मिळाल्या आहेत. भडगाव ग्रामीण रुग्णालयातही दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हे काम होणार आहे.


संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com