सामुदायिक शौचालय अभियानांतर्गत जिल्ह्याचा सन्मान 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि. रा. लोखंडे आदींनी पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रीय पुरस्काराने जळगाव जिल्ह्याच्या स्वच्छतेच्या कार्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
 

जळगाव : सामुदायिक शौचालय अभियान स्पर्धेत देशपातळीवर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जळगाव जिल्हचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. २) व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे गौरव करण्यात आला. केंद्रीय जलशक्तिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि. रा. लोखंडे आदींनी पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रीय पुरस्काराने जळगाव जिल्ह्याच्या स्वच्छतेच्या कार्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘एनआयसी’ सभागृहात झालेल्या व्हर्च्युअल पुरस्कार वितरण कार्यक्रमाला कनिष्ठ प्रशासन अधिकारी हृषीकेश भदाणे, जलनिरीक्षक दीपक राजपूत, संवादतज्ज्ञ नीलेश रायपूरकर आदींची उपस्थिती होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता दिवस म्हणून देशभरातील विविध पुरस्कारांसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा व ग्रामपंचायतींचा गौरव झाला. वितरण कार्यक्रमात केंद्रस्तरावर जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग, अपर सचिव अरुण बारोका यांची उपस्थिती होती. 

स्वच्छता साधनांबाबत स्वमालकीची भावना 
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहित करण्यासाठी सामुदायिक शौचालय अभियान स्पर्धा आयोजित केली होती. ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गावस्तरावर स्वच्छता साधनांविषयीची स्वमालकीची भावना वाढविणे आणि सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होऊन त्याची देखभाल होण्याच्या उद्देशाने १५ जून ते १५ सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ही स्पर्धा घेतली होती. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने घोषित केलेल्या सामुदायिक शौचालय अभियान स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक जिल्ह्याने पटकावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district community toilets abhiyan award