अबब... जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 23 हजार रुग्ण वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाने रुग्णांवर उपचारासाठी शासकीय वसतिगृहे, महाविद्यालये, शाळा, आयटीआय, महिला रुग्णालय आदी अधिग्रहित करण्यास सुरवात केली आहे. 

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्या आजअखेरपर्यंत तीन हजार 720 झाली आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. बाधितांची संख्या तब्बल 23 हजारांपर्यंत पोचू शकते, असा अंदाज बांधत आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाने रुग्णांवर उपचारासाठी शासकीय वसतिगृहे, महाविद्यालये, शाळा, आयटीआय, महिला रुग्णालय आदी अधिग्रहित करण्यास सुरवात केली आहे. 
जिल्ह्यात 28 मार्चला मेहरुण परिसरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. 2 एप्रिलला दुसरा रुग्ण बागवान मोहल्यात आढळला. 15 एप्रिलपर्यंत जळगाव जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. नंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेल्याने जिल्हा रेड झोनमध्ये आला. तो आजतागायत आहे. 

मृत्युदर वाढलेलाच 
कोरोना रुग्णांचा राज्यात सर्वाधिक मृत्युदर जळगाव जिल्ह्याचा आहे. याची दखल घेत राज्य समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. त्यात कोरोनाची लक्षणे दिसताच रुग्ण येत नाही. त्यांना श्‍वास घेण्यास अधिक त्रास होतो, तेव्हा ते येतात. त्यांना अगोदरच विविध व्याधी असतात. त्यात ब्लड प्रेशर, तणाव, हृदयासंबंधीचे आजार, क्षयरोग, फुफुसाचे आजारांचा समावेश आहे. पूर्वीचे आजार त्यात कोरोनामुळे मृत्यू अधिक झाल्याचा अहवाल शासनाला दिला. जिल्हा प्रशासनाने 24 जून ते 8 जुलैदरम्यान नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले. ही मोहीम सुरू करण्याअगोदर कधी दहा ते 12, तर कधी 100 रुग्ण आढळून आले. आज तब्बल तीन हजार 720 पर्यंत बाधित आहेत. 

अकरा हजार बेड तयार 
भविष्यात 23 हजारांपर्यंत रुग्ण वाढू शकतात, असा अंदाज बांधित जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आवश्‍यक उपकरणांसह 11 हजार 243 बेड तयार आहेत. जिल्ह्यात एकूण 78 कोविड केअर सेंटर आहेत. या सेंटरमध्ये नऊ हजार 142 बेड आहेत. जिल्ह्यात 23 कोविड हेल्थ सेंटर असून, त्यात एक हजार 41 बेड आहेत. 
कोविड हॉस्पिटलचे दहा युनिट असून, त्यात एक हजार 50 बेड आहेत. तेथे आवश्‍यक वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा आहे. वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाने आदिवासी विभागाची सर्व होस्टेल, आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाचे होस्टेल्स, सर्व आयटीआय अधिग्रहित करण्यास सुरवात केली आहे. 
 
रुग्णवाढीची कारणे 
* लक्षणे दिसताच तपासणी करून घेत नाहीत 
* सोशल डिस्टन्सिंगचे पालन योग्य नाही 
* गर्दीत जाण्यास नागरिकांची पसंती 
* तोंडाला मास्क न लावता अनेकांची भटकंती 
* मला काहीही होणार नाही, या भ्रमात कोठेही फिरणे 
* पोलिसांकडून 144 ची कडक अंमलबजावणी न होणे 
 
...या आहेत उपाययोजना 
* गर्दीच्या ठिकाणी पोलिस हवेत 
* मास्क न घालणे, गर्दी करण्यावर नियंत्रण हवे 
* नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे 
* योगासन, अनुलोम, विलोम, व्यायाम करणे 
* आयुर्वेदिक काढा घेणे 
* इम्युनिटी पॉवर वाढविणे 
 
दृष्टिक्षेपात 
- उपचार घेत असलेले ः एक हजार 271 
- बरे झालेले ः दोन हजार 199 
- एकूण मृत्यू ः  250


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district corona virus spread and 23 thousand new patient