जिल्ह्यात 569 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आतापर्यंत एकूण 1 लाख 27 हजार 683 लाभार्थ्यांना 729 कोटी 87 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. 

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंका, ग्रामीण बॅंका, खासगी बॅंकांच्या व इतर बॅंकांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आतापर्यंत 1 लाख 41 हजार 44 शेतकऱ्यांना 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली. 

शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्‍यक असणारी बि-बियाणे व खते खरेदी करता यावी तसेच मशागतीची कामे करता यावी याकरीता महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या व इतर शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी पीक कर्ज उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनातर्फे सहकार विभागास दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत श्री. राठोड यांचेशी चर्चा करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध होईल याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

2020-2021 साठी खरीप कर्ज वाटपाचा 2892 कोटी 68 लाख 23 हजार रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. तर रब्बी हंगामासाठी 447 कोटी 22 लाख 36 रुपयांचा लक्षांक असा खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण 3339 कोटी 90 लाख 59 हजार रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामासाठी 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. 

या पीक कर्ज वाटपात सर्वाधिक वाटा हा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचा असून या बॅंकेने 1 लाख 35 हजार 43 शेतकऱ्यांना 442 कोटी 16 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बॅंकांनी 4 हजार 335 शेतकऱ्यांना 69 कोटी 1 लाख 77 हजार रुपये, ग्रामीण बॅंकांमार्फत 161 शेतकऱ्यांना 1 कोटी 80 लाख 39 हजार रुपये, खासगी बॅकांमार्फत 1 हजार 505 शेतकऱ्यांना 56 कोटी 15 लाख 27 हजार रुपये याप्रमाणे सर्व बॅंकामिळून जून, 2020 अखेर 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने वाटप केलेल्या 1 लाख 35 हजार 43 शेतकऱ्यांपैकी 86 हजार 213 कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना 269 कोटी 28 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district farmer 569 carrore pik loan distribute