बापरे; सोळा हजार ३७६ शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corn kharedi

जिल्ह्यातील १६ शासकीय खरेदी केंद्रांत २० हजार ४६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी ३० जुलैअखेर फक्त चार हजार ८६ शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला, तर १६ हजार ३७६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही अजून त्यांचा मका मोजणी बाकी आहे.

बापरे; सोळा हजार ३७६ शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत 

चोपडा (जळगाव) : केंद्र शासनाने राज्यातील शिल्लक असलेला वाढीव अडीच लाख मका खरेदीला मंजुरी दिली. त्यानुसार मका खरेदी सुरू असताना, ३० जुलैला अचानक दुपारी दीडला शासनाचे ऑनलाइन मका खरेदी पोर्टल बंद पडले. त्यामुळे राज्यातील मका खरेदी बंद करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही त्यांचा मका खरेदी केला जात नसून, दोन महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. 
जिल्ह्यातून सर्वाधिक प्रतीक्षेत असलेले शेतकरी भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, धरणगाव, एरंडोल, अमळनेर येथील आहेत. जामनेर येथे एक हजार ८७० पैकी ४९ शेतकऱ्यांच्या मक्याची मोजणी झाली. एक हजार ८२१ शेतकरी अजून बाकी आहेत. वशील्याने मोजणी झाली की काय, अशी शंका निर्माण होत आहे. 
जिल्ह्यातील १६ शासकीय खरेदी केंद्रांत २० हजार ४६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी ३० जुलैअखेर फक्त चार हजार ८६ शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला, तर १६ हजार ३७६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही अजून त्यांचा मका मोजणी बाकी आहे. त्यांचा नंबर उशिरा आहे. त्यात त्यांची काय चूक आहे. शासनाने मका मोजणीचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते. हजारो शेतकऱ्यांची शासकीय मका खरेदी कधीपर्यंत होणार, असे प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत. 
ज्या शेतकऱ्यांचा मका मोजला गेला ते तुपाशी तर बाकीचे शेतकरी उपाशी, असा प्रकार शासनाने केला असून, शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टा चालविली आहे. मका खरेदी होईल, अशी आशा जिल्ह्यातील १६ हजार ३७६ शेतकऱ्यांना आहे. 

शासनाची नावलाच खरेदी 
जिल्ह्यातील १६ खरेदी केंद्रांवर एकूण २० हजार ४६२ शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी फक्त चार हजार ८६ शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला. १६ हजार ३७६ नोंदणी केलेले शेतकरी अजून ताटकळत आहेत. म्हणजे एकूण नोंदणीपैकी १९.९६ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी झाला, तर ८० टक्के शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 

जिल्ह्यातील नोंदणी व प्रतीक्षेत असलेले शेतकरी 
१६ शासकीय खरेदी केंद्रनिहाय नोंदणी केलेले शेतकरी व कंसात मका मोजणी बाकी असलेले शेतकरीसंख्या 
अमळनेर- १,५३४ (१,३१६) 
चोपडा- १,०६१ (७७१) 
पारोळा- १,७२३ (१,२४०) 
एरंडोल- १,५१९ (१,३२०) 
धरणगाव- १,९९२ (१,५७०) 
जळगाव- ६६३ (४७८) 
भुसावळ- २३२ (८१) 
यावल- ४३८ (१४८) 
रावेर- १,१७८ (७९२) 
मुक्ताईनगर- ८४२ (६५१) 
बोदवड- ८६० (८२१) 
जामनेर- १,८७० (१,८२१) 
शेंदुर्णी- ७७६ (५८७) 
पाचोरा- १,८७८ (१,३३८) 
भडगाव- २,३३१ (२,१२९) 
चाळीसगाव-१,५६५ (१,३१३) 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top