esakal | घर खरेदीची ‘दिवाळी’; एका महिन्यातच सात हजार खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

home

कोरोनाकाळात जागा, मालमत्ता खरेदी-विक्रीला शासनाने बंदी घातली होती. मात्र सणासुदीच्या दिवसांपूर्वीच हे व्यवहार सुरू झाले. शासनाने जागा, मालमत्ता खरेदी-विक्रीच्या मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांची सवलत देण्यात आली होती.

घर खरेदीची ‘दिवाळी’; एका महिन्यातच सात हजार खरेदी

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व त्याआधीही विविध कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्र कमालीचे अडचणीत आले होते. लॉकडाउनचा मोठा फटका या क्षेत्राला बसला. मात्र, त्यावर उपाययोजना म्हणून शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीचा परिणाम यंदा दसरा-दिवाळीत दिसून आला आहे. या कालावधीत गेल्या वर्षीच्या ३५ टक्के अधिक घरांची विक्री झाली आहे. 
कोरोनाकाळात जागा, मालमत्ता खरेदी-विक्रीला शासनाने बंदी घातली होती. मात्र सणासुदीच्या दिवसांपूर्वीच हे व्यवहार सुरू झाले. शासनाने जागा, मालमत्ता खरेदी-विक्रीच्या मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांची सवलत देण्यात आली होती. यामुळे घरे खरेदीला वेग आला आहे. मुद्रांक शुल्कात कपात झाल्याने शासनाला महसूल कमी मिळाला. मात्र खरेदीचे प्रमाण वाढले आहे. 

कोरोनाकाळानंतर दिलासा 
कोरोनाकाळात घरनोंदणीत मोठी घट झाली होती. बांधकाम क्षेत्र या कालावधीत खालावले गेले होते. त्याला उभारी देण्यासाठी शासनाने २६ ऑगस्टला दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय घेण्यात आला. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० यादरम्यान मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांनी, तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ मार्चदरम्यान दोन टक्क्यांनी मुद्रांक शुल्क दोन टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. 

सात हजार घरे विक्रीस
शहरी भागात मुद्रांक शुल्क ६ टक्के, तर ग्रामीण भागात ५ टक्के आहे. शासनाच्या सवलतीनंतर घर खरेदीत मुद्रांक शुल्कात ३ टक्के सूट दिली गेली. यामुळे घर खरेदीला गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के अधिक प्रतिसाद मिळाला. दुय्यम नोंदणी विभागाच्या माहितीनुसार सप्टेंबर २०१९ मध्ये चार हजार ७९२ घरांची विक्री झाली. त्यातून १३ कोटी ७८ लाखांचा महसूल मिळाला. त्या तुलनेत सप्टेंबर २०२० मध्ये सहा हजार ९४७ दस्तांची नोंदणी झाली. त्यातून ३० कोटी ७५ लाखांचा महसूल मिळाला. 
 
दस्त नोंदणीची तुलनात्मक आकडेवारी 
महिना--दस्त नोंदणी--महसूल 
सप्टेंबर २०१९--४,७९२--१३ कोटी ७८ लाख 
ऑक्टोबर २०१९-३,४५९--३० कोटी ४ लाख 
नोव्हेंबर-२०१९--६,२९२--१७ कोटी ७४ लाख 

सप्टेंबर २०२०---६,९४७--३० कोटी ७५ लाख 
ऑक्टोबर २०२०---६,८४४--१३ कोटी ११ लाख 
नोव्हेंबर २०२०--४,८९८--७ कोटी २३ लाख---------- 


कोरोनामुळे एप्रिल महिन्यात सर्व व्यवहार बंद होते. आता शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने मालमत्ता, जागा खरेदीची प्रकरणे वाढली आहेत. दस्त नोंदणी वाढली असली तरी महसुलात घट झाली आहे. दसरा, दिवाळीत दस्त नोंदणीत ३५ टकके वाढ झाली आहे. 
-सुनील पाटील, सहजिल्हा निबंधक (वर्ग २) तथा प्रशासकीय अधिकारी 
 
घरांच्या खरेदीवर मुद्रांक शुल्कात शासनाने सूट दिल्याने घरांच्या विक्रीला ‘बूस्ट’ मिळाला आहे. दसरा, दिवाळीत नागरिकांनी खरेदीचे व्यवहार केले. मुद्रांक शुल्कातील सुटीचा फायदा त्यांना झाला. खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले. 
-ॲड. पुष्कर नेहते,सचिव, क्रेडाई, जळगाव 

संपादन ः राजेश सोनवणे