सणासुदीत करावी लागणार काटकसर; शेव, चकलीचा राऊंड कमी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

काही व्यापाऱ्यांनी उत्पादन कमी होणार असल्याने डाळींची साठवणूक केली आहे. त्यामुळे बाजारात डाळींची कृत्रिम टंचाई निर्माण झाले आहे. 

वावडे (ता. अमळनेर) : अतिपावसामुळे मूग, उडीद खराब झाले. त्यातच साठेबाजांनी माल साठवून ठेवल्यामुळे यंदा डाळींचे भाव कडाडले आहेत. विदेशातून हरभऱ्याच्या आयातीवर परिणाम झाला. सणासुदीमुळे हरभराडाळीला मागणी वाढली आहे, यामुळे डाळींचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना ऐन सणासुदीच्या काळात काटकसर करण्याची वेळ आली आहे. 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेरोजगारी आणि नोकरदारांच्या वेतनात झालेली कपात यासह इतरही अडचणींमुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. पाऊसही दररोज हजेरी लावत असल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता बदलली आहे. काही व्यापाऱ्यांनी उत्पादन कमी होणार असल्याने डाळींची साठवणूक केली आहे. त्यामुळे बाजारात डाळींची कृत्रिम टंचाई निर्माण झाले आहे. 

शेव, चकली होणार कमी
दिवाळीचा फराळ म्‍हटला म्‍हणजे शेव आणि चकली आलीच. याशिवाय शिवाय दिवाळीचा फराळ पुर्ण होत नाही. महिनाभर पुरेल इतका फराळ महिला वर्ग तयार करत असतात. यंदा मात्र हे सर्व झालेले पाहण्यास मिळणार आहे. कारण डाळींचे दर वाढल्‍याने शेव आणि चकली कमी प्रमाणात तयार केली जाणार. शिवाय तेलाचे भाव देखील वाढले असून चिवडा, शंकरपाडे देखील कमी तयार करण्याची शक्‍यता आहे.

डाळींचे भाव असे 
पंधरा दिवसांपूर्वी बाजारात ९० किलो असणारी तूरडाळ आता १२० ते १२५ रुपये किलो झाली आहे. ५७ ते ६२ रुपये दराने मिळणारी हरभराडाळ या आठवड्यात ६५ ते ७० रुपयांनी मिळत आहे. उडीदडाळीचा भाव ९० ते ९५ रुपयांवरून १०० ते ११० रुपयांवर पोचला आहे. मूगडाळ ८० ते ८२ रुपयांवरून १०० ते ११० रुपये एवढी वधारली आहे. मसूरडाळ ८५ ते ९० रुपयांवर गेली आहे. बेसन ८५ ते ९० प्रतिकिलो झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon diwali festival market oil and dal rate high