
जळगाव ः तरसोद ते फागणेदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला पूर्ण क्षमतेने अद्याप सुरवात झालेली नाही. या मार्गावरील काही ठिकाणीच काम झाल्याचा दावा आग्रोह इन्फ्रास्ट्रक्चरने केला असला, तरी तरसोदपासूनच्या कामालाच विविध परवानग्यांअभावी ‘ब्रेक’ बसला आहे.
आग्रोह इन्फ्रास्ट्रक्चरला तरसोद ते फागणे कामाचे कंत्राट मिळाले आहे. काम लवकर पूर्ण होण्यासाठी या कंत्राटदाराने काही ठिकाणी सब कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. तरसोद ते असोदा रेल्वे गेटदरम्यान चार ते पाच किलोमीटरचे काम नाशिक येथील व्ही. डी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चरला दिले आहे. या कंपनीचे कामगार, इंजिनिअर असे २० जण जुलै महिन्यापासून काम करण्यासाठी दाखल झाले आहेत. मुरूम, खडी इतर साहित्य वाहून नेण्यासाठी दहा डंपर, क्रेन, रोडरोलरही दाखल झाले आहे. पाटील इन्फ्रास्ट्रक्चरने आतापर्यंत ज्या मार्गाचे चौपदरीकरण केले तेथे चार फूट खोदून त्या ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम सुरू केले. मात्र मुरूम उचलण्याची परवानगी मूळ कंत्राटदाराने दिलेली नाही.
कामात अडचणींचा डोंगर
या मार्गात येणारे मोठे वृक्ष तोडण्याची परवानगी मिळालेली नाही. मार्गाच्या कामात तरसोद बसथांबा, विजेचे खांब, एमआयडीसीची जलवाहिनी काम करताना अडचणीची ठरत आहे. वृक्ष तोडल्याशिवाय, बसथांबा हटविल्याशिवाय व विजेचे खांब वीज कंपनीने हटविल्याशिवाय महामार्गाचे मूलभूत कामच करता येणार नाही. मूळ कंत्राटदाराकडूनच परवानगी दिली जात नाही. यामुळे काम रखडले आहे. आमच्याकडे सर्व साधने आहेत, मात्र परवानगी नाही. यामुळे आम्ही कामाविना बसलो असल्याचे पाटील इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभियंत्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
एरंडोल ते पिंपळकोठा खड्डेच खड्डे
एरंडोल ते पिंपळकोठादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे तयार झाले आहेत. वाहनधारकांना वाहने चालविणेही कठीण झाले आहे. या मार्गावर अनेक अपघातही होत आहेत. हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
मी कामावर रुजू होऊन वीस दिवस झाले. तरसोदपासून कामाला परवानगी दिली की नाही, याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो.
-काशीनाथ बोरसे, प्रकल्पप्रमुख
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.