‘अमृत’च्या विषाची परीक्षा; एकेका रस्त्यावर चारवेळा चालतेय ‘जेसीबी’ 

सचिन जोशी
Monday, 7 December 2020

‘अमृत’च्या करारात तरतूद असूनही मक्तेदार या खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करायला तयार नाही. 

जळगाव : तीन वर्षांपासून अमृत योजनेच्या नावाखाली विषाची परीक्षा देणाऱ्या जळगावकरांची कसोटी आणखी बिकट झाली आहे. एकेका रस्त्यावर तीन-चार वेळा जेसीबी चालते, दुरुस्ती मात्र एकदाही होत नाही. झाली तर ती नावापुरतीच, असा अनुभव अनेकदा येत असून, या नरकयातना अजून किती दिवस सहन करायच्या? असा प्रश्‍न संतप्त नागरिकांमधून उपस्थित होतोय. 

अमृत योजनेंतर्गत रस्ते खोदून जलवाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षांपासून शहरात सुरू आहे. या काळात शहरातील प्रमुख रस्ते, उपरस्ते तसेच नागरी वस्त्यांमधील जवळपास ७० ते ८० टक्के रस्ते खोदून ठेवण्यात आलेत. कोणतेही नियोजन न करता हे खोदकाम झाले असून, ‘अमृत’च्या करारात तरतूद असूनही मक्तेदार या खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करायला तयार नाही. 

एकेका रस्त्याची व्यथा 
सध्या ‘अमृत’ अंतर्गत नागेश्‍वर कॉलनीत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे दुर्दैव असे की, आतापर्यंत या भागात जवळपास चारवेळा रस्ता खोदून ठेवला. त्र्यंबकनगर शाळेसमोरून नागेश्‍वर कॉलनी रिक्षाथांब्यापर्यंत सुरवातीला उजव्या बाजूने रस्ता खोदला, जलवाहिनी टाकली. तात्पुरत्या स्वरूपात तो बुजवण्यात आला. नंतर याच रस्त्यावर डाव्या बाजूने खोदकाम झाले, जलवाहिनी टाकून चारी कशीबशी बुजली. पुन्हा रस्त्याच्या उजव्या बाजूने लाइफस्टाइल रेसिडेन्सिसाठी स्पेशल आमदार निधीतून जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला आणि आता पुन्हा डाव्या बाजूने अमृत योजनेसाठी रस्ता खोदून ठेवला आहे. एकेक रस्ता कितीदा खोदणार? असा संतप्त प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

दुरुस्तीही नाहीच 
दुर्दैव असे, की रस्ता चारदा खोदला, परंतु चांगली दुरुस्ती एकदाही झाली नाही. या रस्त्याला मिळणारे उपरस्तेही अगदी मधोमध खोदून ठेवलेय. अनेकांची नळजोडणी तुटली, त्यांना सध्या पाणीही मिळत नाही. काही दिवसांपासून सुरू असलेले हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, ते कधी पूर्ण होणार? हे कुणी सांगत नाही. 

हतबल मनपा, मजीप्रा 
महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही प्रशासनांनी ‘अमृत’चे काम मॉनिटर करणे अपेक्षित असताना दोन्ही यंत्रणा त्यापासून अगदी अलिप्त आहेत. नगरसेवक, अधिकाऱ्यांना विचारले तर ते मक्तेदाराचे काम आहे, असे सांगितले जाते. मक्तेदार समोर येतच नाही. जे काम करतात, त्या लोकांना विचारले, तर आम्हाला एवढेच काम करायचेय, असे सांगितले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नेमकं या प्रकरणात काय करतेय, हे कुणालाही माहीत नाही. या स्थितीत जळगावकरांच्या नरकयातना कमी व्हायला तयार नाहीत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon each road is dug four times for water supply scheme