खडसे शिवसेनेत येण्याचा विषय गुलाबराव बघून घेतील ! 

सचिन जोशी
Saturday, 19 September 2020

मंत्री सामंत यांनी खडसेंना शिवसेनेची खुली ‘ऑफर’ असल्याचे सांगत त्यांच्यासोबत भाजपमधील काही नाराज आमदारही शिवसेनेत येण्यास उत्सुक असल्याचा दावा केला होता.

जळगाव : भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर नाराज माजी मंत्री एकनाथ खडसेंना शिवसेनेत येण्याची खुली ‘ऑफर’ देणाऱ्या विषयावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी बोलणे टाळले. जिल्ह्याचे नेते म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील ते बघतील, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. 

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार, हे निश्‍चित झाल्यानंतर विद्यापीठाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामंत शुक्रवारी जळगावात आले होते. विद्यापीठातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी आटोपता संवाद साधला. या वेळी खडसेंना आपण दिलेली शिवसेनेची ‘ऑफर’ व त्यासंदर्भात पुढे काय झाले, अशी विचारणा केली असता, जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे ज्येष्ठ सहकारी गुलाबराव पाटील तो विषय बघतील, असे मंत्री सामंत म्हणाले. 

फडणवीस सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून श्री. खडसे राज्य नेतृत्वावर नाराज आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी फडणवीसांचे नाव घेऊन टीका केली. नंतर लगेचच मंत्री सामंत यांनी खडसेंना शिवसेनेची खुली ‘ऑफर’ असल्याचे सांगत त्यांच्यासोबत भाजपमधील काही नाराज आमदारही शिवसेनेत येण्यास उत्सुक असल्याचा दावा केला होता.  

खडसें कोणत्या पक्षात जाणार ? 

कोरोना, तसेच अभिनेता सुशातसिंह आत्महत्या प्रकरणात भाजपने महाआघाडी सरकाराला चांगले कोंडीत पकडले आहे. त्यात खडसेंनी दुसऱया बाजूने फडणवीसांवर शाब्दीक तोफ डागणे सुरू केले आहे. त्यामुळे खडसेंचा राष्ट्रवादी, शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहे. त्यात राष्ट्रवादीचे जयंत पाटील खडसे प्रवेशाची चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेनेची खडसेंनी खुली ऑफर असून गुलाबराव पाटील त्यांच्या प्रवेशाची बघून घेतील असा मंत्री सामंत जास्त न बोलता सुचक विधान केले आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Education Minister Samant said that Eknathrao Khadse's entry into Shiv Sena will be seen by Gulabrao Patil