विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या यादीत एकनाथ खडसेंचा समावेश

भूषण श्रीखंडे
Friday, 6 November 2020

दिवाळी नंतर एकनाथ खडसे मोठा प्रवेश सोहळा कार्यक्रम घेवून मोठा बाँम्ब फोडून खडसेंची ताकद काय हे दाखविणार आहे. त्यात आज राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या यादीत नाव आले आहे.

जळगाव ः राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्यांसाठी आज महाविकास आघाडीतर्फे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ जणांच्या नावांची यादी सोपवली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसेंचे नाव यादीत अपेक्षा प्रमाणे आले आहे. त्यामुळे खडसे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम ठोकला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या हस्ते प्रवेश त्यांनी घेत खानदेशात भाजपला मोठी खिंडार पाडण्याचे त्यांनी काम सुरू केले. जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव, धुळे आदी खानदेशातील अनेक भाजपचे खडसेंच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. अजून ही प्रवेशाचा ओघ सुरू असला तरी दिवाळी नंतर एकनाथ खडसे मोठा प्रवेश सोहळा कार्यक्रम घेवून मोठा बाँम्ब फोडून खडसेंची ताकद काय हे दाखविणार आहे. त्यात आज राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या यादीत नाव आले असल्याने खडसे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. 

खडसेंचे नाव मंजूर होणार का ?
राज्यपाल नियुक्त हे सदस्यांचे नावे असून सत्ताधारी महाविकास आघाडीने  कायदेशीर बाबींचा पूर्तता करून नावे राज्यापालांकडे दिली आहे. परंतू राज्यपाल आणि राज्यशासन यांच्यातील वाद तसेच खडसेंनी भाजप सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले गंभीर आरोप बघता खडसेंचे नाव निश्चीत होईल का देखील पुढे प्रश्न उपस्थित होणार आहे.    
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse included in NCP's list for Legislative council