खडसे समर्थकांच्या बॅनरवरुन कमळ गायब, गाड्या सज्ज, मुंबईच्या दिशेने प्रवासाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

मुक्ताईनगर तालुक्यात कार्यकर्‍त्‍यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यात खडसेंच्या पक्षांतरबाबत सूचक मजकूर लिहिलेला आहे. 'भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण',

जळगाव : भाजपचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्‍ट्रवादी प्रवेशाबाबत खलबते सुरू आहे. यात एकनाथ खडसे यांच्या समर्थकांकडून जोरदार तयारी सुरू असून, मुक्‍ताईनगर परिसरात बॅनरबाजी देखील सुरू झाली आहे. कार्यकर्‍त्‍यांनी बॅनर लावत त्‍यावरून कमळ गायब करत भाऊ तुम्‍ही बांधाल तेच तोरण...असा मजकूर देखील लिहला आहे.

अनेक दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अनेक मुहूर्त देखील जुळविण्यात आले होते. परंतु आता गुरुवारी (२२ ऑक्टोबर) खडसेंची कन्या ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर या देखील खडसेंसोबत राष्ट्रवादीत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरात त्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. यावरून भाजपचे कमळ चिन्ह काढून टाकण्यात आले आहे.

समर्थकांचा उत्‍साह
राष्ट्रवादी प्रवेशासाठी एकनाथ खडसे हे उद्या मुंबईला जाणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. त्यांचा प्रवेश सोहळा हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु, याला खडसेंनी दुजोरा दिलेला नाही. असे असताना खडसे समर्थकांचा उत्साह आतापासूनच पाहण्यास मिळू लागला आहे. 

भाऊ तुम्‍ही बांधाल तेच तोरण
मुक्ताईनगर तालुक्यात कार्यकर्‍त्‍यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यात खडसेंच्या पक्षांतरबाबत सूचक मजकूर लिहिलेला आहे. 'भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण', अशा आशयाचा मजकूर बॅनरवर आहे. या बॅनरबाजीची जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse muktainagar taluka banner