स्वयंभू खडसेंचे राजकारणातील नवे वळण

eknath khadse
eknath khadse

जळगाव : आमदार किंवा कुठलेही संविधानिक पद नसतानाही राज्याच्या राजकारणात ज्यांचा दरारा आहे, असे एकनाथ खडसे. कोथळीच्या सरपंचपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल विधानसभेवर सलग सहा वेळा आमदार, भाजप विधिमंडळ गटाचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि युती व फडणवीस सरकारच्या काळात राज्य मंत्रिमंडळातील सदस्य अशी राहिलीय. त्यांचा थक्क करणारा प्रवास राहिला असून आता या स्‍वयंभू खडसेंचे नवे वळण त्‍यांच्या राजकीय प्रवासाला कोणती दिशा ठरविणार हे पाहण्याचे असेल.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाच्या सामान्य शेतकरी कुटुंबात २ सप्टेंबर १९५२ ला एकनाथ खडसेंचा जन्म झाला. अकोला येथे वाणिज्य विषयातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगरातच समाजकारण सुरू केले. विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, अध्यक्ष, कोथळी गावचे सरपंच या स्थानिक पदांपासून सुरू झालेली खडसेंची राजकीय वाटचाल आज चार दशकांनंतरही तशीच अविरत सुरू आहे. १९८० ते १९८५ या पाच वर्षांच्या काळात ते कोथळी गावचे सरपंच होते. याचदरम्यान त्यांचा जनसंघ, भाजपशी संपर्क आला. तेव्हापासून भाजपसोबत जोडले गेल्यानंतर सुरवातीला मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्ष आणि नंतर पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष झाले. 

पहिली आमदारकीचा प्रवास
भाजपच्या उमेदवारांना अनामत वाचविणेही शक्य व्हायचे नाही, अशा काळात १९९० मध्ये त्यांना तेव्हाच्या एदलाबाद (आताचा मुक्ताईनगर) विधानसभा क्षेत्रातून भाजपची उमेदवारी मिळाली. भाषणही करता येत नसलेल्या एकनाथरावांनी या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून मुक्ताईनगर..भाजप आणि एकनाथ खडसे असे समीकरण बनले. त्यानंतर तब्बल तीस वर्षे म्हणजे १९९० ते २०१९ या काळात त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 

युती सरकारमध्ये मंत्री 
१९९५ मध्ये खडसे दुसऱ्यांदा निवडून आले. योगायोगाने तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात खडसेंना सुरवातीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, नंतर अर्थ व नियोजन आणि सरकारच्या शेवटच्या दोन वर्षांतील काळात पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. या तिन्ही खात्यांचा कारभार त्यांनी अत्यंत सक्षम व समर्थपणे सांभाळला. तर २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात खडसेंकडे महसूल, मदत व पुनर्वसन, कृषी, उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक, मत्स्य व पशुसंवर्धन-दुग्धविकास अशा विविध १२ खात्यांची जबाबदारी होती. ती त्यांनी जून २०१६ पर्यंत समर्थपणे सांभाळली. 

विरोधी पक्षनेते म्‍हणून वेगळा ठसा 
१९९९ मध्ये युतीचे सरकार गेले. मात्र, खडसे तिसऱ्यांदा निवडून आले. तेव्हापासून २०१४ पर्यंत ते सातत्याने विधानसभेवर निवडून आले. १९९९ ते २०१४ अशा १५ वर्षांच्या कार्यकाळात ते विधानसभेत गटनेते, २००९ ते १४ विरोधी पक्षनेते होते. या काळात त्यांनी आपल्या अभ्यासू, आक्रमक भाषणांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात अक्षरश: रान पेटवून भाजपची एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आणि राज्यात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला. 

आरोप आणि राजीनामा 
खडसेंवर मे २०१६ मध्ये विविध प्रकारचे आरोप झाले. दाऊदच्या पत्नीशी संभाषण, कथित स्वीय सहाय्यकाचे लाच प्रकरण, भोसरी जमीन खरेदी आदी आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. भोसरी जमीन खरेदी प्रकरण वगळता अन्य सर्व आरोपांत त्यांना क्लीन चिट मिळाली. मात्र, त्यांचे पुन्हा पुनर्वसन होऊ शकले नाही. पक्षात वारंवार डावलल्याची भावना त्यांनी केंद्रीय नेतृत्वापर्यंत व्यक्त केली, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात येऊन त्यांची कन्या ॲड. रोहिणी यांना तिकीट मिळाले, मात्र त्यांचा पराभव झाला. नंतरही पक्षाकडून विधान परिषदेवर घेण्याचे आश्‍वासन मिळाले, मात्र ते पूर्ण झाले नाही. अखेरीस बुधवारी, २१ ऑक्टोबरला त्यांनी भाजपचा त्याग करत राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा केली. 

आता नवी वाटचाल
एकनाथ खडसेंनी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले. यानंतर राज्‍यातील संपुर्ण राजकीय समीकरण बदलण्याचे चित्र निर्माण झाले आहे. यात प्रामुख्याने गेल्‍या तीस वर्षांपासून जळगाव जिल्‍हा परिषदेवर असलेला भाजपचा झेंडा देखील अस्‍थिर होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तर जळगाव महापालिकेवर प्रथमच भाजपने सत्‍ता काबीज केली असून येथील खडसे गट बाहेर पडल्‍यास मनपावरील भाजपला पुन्हा सत्‍ता काबीज करणे कठीण जाणार आहे. खडसेंचा राष्‍ट्रवादीतील हा राजकीय प्रवास जिल्‍ह्‍यात तरी नक्‍कीच बदल घडविणारा ठरणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com