esakal | खडसेंचे पक्षांतर.. राजकीय अपरिहार्यतेचा निर्णय! 
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

साडेतीन- चार दशकांपासून भाजपत केवळ सक्रिय असलेलेच नव्हे तर सबंध उत्तर महाराष्ट्रात या पक्षाची पाळेमुळे रुजविणारे, पक्षाचा बहुजन चेहरा म्हणून ओळख असलेले नेते अशी एकनाथ खडसेंची ओळख.

खडसेंचे पक्षांतर.. राजकीय अपरिहार्यतेचा निर्णय! 

sakal_logo
By
सचिन जोशी

गेल्या चार वर्षांत पक्षाकडून, विशेषत: राज्य नेतृत्वाने वारंवार डावलल्यानंतर.. काहीतरी राजकीय भूमिका घेणे एकनाथराव खडसेंना भाग पडले आणि त्यांनी अखेर राष्ट्रवादीचा पर्याय निवडला. म्हणायला हे बंड असले तरी त्यामागे सत्तापद प्राप्तीची महत्त्वाकांक्षा कमी आणि आपल्याच पक्षातून डावलल्याची, अन्यायाची भावना अधिक आहे. काही केल्या भाजपकडून पुनर्वसन होणार नाही, हा समज ठाम झाल्यानंतर पक्षांतराचा निर्णय त्यांच्यासाठी राजकीय अपरिहार्यताच होती. दुर्दैवाने भाजपकडूनही त्यांना रोखण्याचे प्रयत्न झालेच नाही, उलट ते कधी पक्षांतर करतील, याचीच व्यवस्था पक्षाने केल्याचे एकूणच घटनाक्रमावरुन दिसून येते. 
 
साडेतीन- चार दशकांपासून भाजपत केवळ सक्रिय असलेलेच नव्हे तर सबंध उत्तर महाराष्ट्रात या पक्षाची पाळेमुळे रुजविणारे, पक्षाचा बहुजन चेहरा म्हणून ओळख असलेले नेते अशी एकनाथ खडसेंची ओळख. चार वर्षांपासून डावलले जात असल्याने खडसे नाराज, अस्वस्थ होते. ‘आपल्याच हाताने वीट वीट रचून बांधलेले घर कसे सोडू?’ या शब्दांत त्यांची अस्वस्थता व्यक्तही झाली. पण, पक्षाकडून त्यांच्या नाराजीची दखल घेतली गेलीच नाही. अखेरीस त्यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधण्याचे ठरवले. 

म्‍हणून खडसे बनले मास लीडर
कोणताही वारसा नसताना एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेने पक्षसंघटनेत जिल्हा, प्रदेश व राष्ट्रीय स्तराच्या विविध पदांवर काम करतो. सोबतच स्वकर्तृत्वातून राजकीय पदांवर काम करताना जनतेच्या मनात स्थान निर्माण करतो.. खडसेंच्या या राजकीय प्रवासाने त्यांना ‘मास लीडर’च्या पंक्तीत बसवले. चाळीस वर्षांपासून जो नेता पक्षात आहे, त्या नेत्यावर आयुष्याच्या उत्तरार्धात पक्ष सोडण्याची वेळ का यावी? याचे उत्तर खडसे समर्थक त्यांच्या बाजूने, तर पक्ष त्याच्या पद्धतीने देईल. मोठ्या परिश्रमातून मिळालेल्या सत्तेची फळे चाखण्याची वेळ आल्यानंतरही ती हिरावून नेल्याने आणि पुढे कुठल्याही राजकीय पदापासून वंचित ठेवल्यानंतर खडसेंसारख्या महत्त्वाकांक्षी आणि आक्रमक नेतृत्वाचा संयम ढळला नसता तरच नवल! 
ऑक्टोबर २०१९पासून तर ते साधे आमदारही नव्हते. आणखी किमान पाच-सात वर्षे तरी सक्रिय राजकारणात राहण्याची इच्छा असताना राजकीय अथवा संघटनेतील कुठलेही पद नाही म्हणून खडसेंना पक्षांतराचा निर्णय अनिच्छेने का होईना, घ्यावा लागला. पक्षत्यागाचा निर्णय जाहीर करताना खडसेंची जी अवस्था झाली, त्यावरुन हा निर्णय त्यांनी अनिच्छेनेच घेतलाय, हे अधोरेखित होते. 
भाजपसारख्या केडरबेस्ड्‌ संघटनेत ४० वर्षे पक्षात काढलेल्या खडसेंना पक्षातून सहज जाऊ देण्यात आले, यामागेही पक्षातील सध्याची बदलेली ‘सिस्टीम’ कारणीभूत आहे. Nation first, Party second, Self last हे ब्रीद असलेल्या पक्षात खरेतर कुठला नेता बंडखोरी करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करुन पक्षाची वाटचाल सुरु ठेवणे.. हे स्वाभाविक म्हणावे लागेल. पण, याआधी भाजपत असे प्रकार झाले नाहीत, हेदेखील तेवढेच खरे. पक्षात कुण्या नेत्याने काही नाराजी व्यक्त केली तर त्याच्याशी चर्चा करुन ती दूर करण्याचा प्रयत्न सामूहिक नेतृत्व करते.. ही पक्षाची पद्धत होती. पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनीही दोनवेळा पक्षनेतृत्वाशी नाराज होऊन वेगळी राजकीय भूमिका घेण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु, त्यावेळी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने मुंडेंशी संवाद साधला, चर्चेतून त्यांची नाराजी दूर केली. विशेष म्हणजे, यापैकी एका प्रसंगांत तर स्वत: खडसेंनी तत्कालीन नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग यांच्याशी बोलून यशस्वी मध्यस्थी केली. त्याच खडसेंवर पक्ष सोडण्याची वेळ आली असताना कुणी एकतर मध्यस्थी केली नाही, किंवा करण्याचा प्रयत्न केला असेलही तरी तो प्रयत्न ‘वर’ यशस्वी ठरला नाही. 

पदे सोडण्याची रिस्‍क कशाला
खडसेंचा प्रभाव किती, कोण गेले त्यांच्यासोबत? हा प्रश्‍न भाजपचे विद्यमान नेतृत्व आपल्या समर्थनार्थ उपस्थित करु शकते. परंतु, ज्यांच्याकडे पक्षातील पदे आहेत, ते खडसेंचे समर्थक असले तरी त्यांना ती पदे सोडण्याची रिस्क घ्यायची नाही. खडसेंची बाजू योग्य वाटणारी मंडळी भाजपत मोठ्या संख्येने आहे, परंतु, पक्ष, तत्व व पदाची आणि भाजपच्या सध्याच्या सिस्टिमध्ये काही बोलण्याचे परिणामही त्यांना माहीत असावे, म्हणून त्याचीही मर्यादा असावी. खडसेंचे पक्षातील सहकारी भाजपत चिंतनाची गरज असल्याचे उघडपणे तर काहीजण दबक्या आवाजात थेट नेतृत्वाविरोधात बोलत आहेत. हा दबका आवाज पुढे खुला होऊ शकतो, याचे भान भाजपश्रेष्ठींना ठेवावेच लागेल. अन्यथा ‘खडसेनाम्या’ची मालिका सुरु झाल्यास ती रोखणे नेृत्वाला नक्कीच जाड जाऊ शकते. 


 

loading image
go to top