esakal | खडसेंच्या राजकीय भूमिकेला वेळेची मर्यादा..! 
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse


मंत्रिमंडळातून राजीनामा आणि नंतरच्या काळात उमेदवारी नाकारण्यापर्यंतचा घटनाक्रम केवळ फडणवीसांमुळे घडल्याचा दावा करत एकनाथराव खडसेंनी पक्षनेतृत्वाला त्याचा जाबही विचारलांय... खडसेंचे समाधान करायचे की नाही, हा चेंडू आता पक्षाच्या कोर्टात असला तरी तो टोलवला गेला नाहीच, तर मात्र पुढल्या राजकीय भूमिकेचा चेंडू आपसूकच खडसेंच्या कोर्टात येतो. अशा स्थितीत खडसेंसमोर पक्षात राहूनच संघर्ष करणे हा एक अन्‌ दुसरा पक्षांतराचा पर्याय उरतो. दुसऱ्या पर्यायातही राष्ट्रवादी की शिवसेना, हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी ते कुठला स्वीकारतात आणि विशेष म्हणजे किती दिवसांत? हा खरा प्रश्‍न आहे. 

खडसेंच्या राजकीय भूमिकेला वेळेची मर्यादा..! 

sakal_logo
By
सचिन जोशी

माजीमंत्री तथा भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्यावरील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निमित्त साधत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांकडूनच त्रास झाला, त्यांना जाब विचारतच राहणार, असा पवित्रा घेत पक्ष नेतृत्वाकडूनही त्यांनी न्यायाची अपेक्षा केली. मंत्रिमंडळातील राजीनामा नाट्यापासून पुढे विधानसभेला उमेदवारी नाकारणे आणि विधानपरिषदेवरही संधी डावलण्यापर्यंतचा घटनाक्रम केवळ फडणवीसांना आपण नको म्हणून झाला. त्यासाठी त्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप खडसेंनी केला. अर्थात, फडणवीसांनी त्याला प्रत्युत्तर दिलेय, पण त्यापुढचे प्रश्‍न कायम आहेत. 
एक तर खडसे राज्याच्या नेतृत्वावर चार वर्षांपासून नाराज आहेत, विविध कार्यक्रम व व्यासपीठावरून ते ही नाराजी व्यक्तही करीत आहेत. यावेळी फरक एवढाच, की त्यांना त्यांच्या नाराजीची धार थेट फडणवीसांवर प्रत्यक्ष नाव घेऊन रोखली. मात्र, खडसेंसारख्या मुरब्बी व ज्येष्ठ नेत्याला दुखवायचेही नाही आणि त्यांच्या नाराजीबद्दल भूमिकाही घ्यायची नाही, असे पक्षाचे सध्याचे धोरण दिसते. अन्यथा, आतापर्यंत खडसेंचा विषय शीर्ष नेतृत्वाने मार्गी लावला असता. 

हे चित्र गेल्या तीन-चार वर्षांत दिसले. त्यामुळे खडसेंच्या राजकीय भूमिकेविषयी सातत्याने अनेक मुद्दे समोर येत गेले. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीच्या वेळी खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आली, तेव्हाही खडसेंना वेगळी राजकीय वाट निवडायची संधी होती. परंतु, तेव्हा मुलीला उमेदवारी मिळाल्याने खडसेंनी तलवार ‘म्यान’ केली. आता पुन्हा ते फडणवीसांविरोधात आक्रमक झालेत. त्यामुळे आताही नव्याने त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या विषयावर चर्चा सुरू झालीय. खडसे आक्रमक होताच, अब्दुल सत्तारांपाठोपाठ उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यांना सेनेची ऑफर दिली. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या येत्या आठवड्यातील जळगाव दौऱ्यात खडसेंच्या प्रवेशाबाबत चाचपणी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

खडसेंनी या पक्षांतराची शक्यता फेटाळून लावली असली, तरी खडसेंसारखा मुरब्बी नेता त्यांच्या पक्षावर नाराज असेल तर हे चित्र ‘कॅश’ करायचा प्रयत्न होणारच. त्यामुळे पक्षांतराची चर्चा असली, तरी आपल्या पक्षात खडसे आल्यानंतर काय..? या प्रश्‍नावर सेना व राष्ट्रवादीमध्येही मंथन सुरूच असेल, याबद्दल शंका नाही. अर्थात, हा सर्व विषय पूर्णपणे खडसेंच्या इच्छेवरच अवलंबून आहे. कोणता पक्ष त्यांना कशी ऑफर देतो, काय अटी-शर्ती असतात, उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे गणित या सर्व बाबींचा त्यात ऊहापोह होणारच. या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेतृत्वाची भूमिका यात महत्त्वाची असली आणि त्यात मतभेद असले, तरी खडसेंच्या कोणत्याही पक्षातील प्रवेशाचा विषय राज्य नेतृत्वाच्या इच्छेवरच अवलंबून आहे.. या सर्व चिंतनात खडसेंच्या मनात काय सुरू आहे, हे अद्याप गुपित आहे. भविष्यातील निर्णय त्यांच्यावरच पूर्णपणे अवलंबून असला तरी त्या निर्णयास वेळेची मर्यादा आहे.. एवढे मात्र निश्‍चित!