
रोजगार हमीची कामे करून गुजराण करण्यावर मजूर भर देतात. नेमके याच काळात राज्यात लॉकडाउन झाले. अनेकांनी मूळगावी स्थलांतर केले.
जळगाव : कोरोनाच्या काळात सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. अनलॉकनंतर बहुतांश सर्वच उद्योगधंदे, व्यापार, दुकाने सुरू झाली आहेत. अनेकांना कामावर पुन्हा घेण्यात येऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे जिल्ह्यात मजुरांअभावी खोळंबली आहेत. शासन या योजनेंतर्गत रोजगार देण्यास तयार आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचे मजूरच कामावर येत नसल्याचे चित्र आहे. नोंदणी केलेल्या मजुरांपैकी केवळ १० टक्केच मजूर कामावर येत आहेत. त्यामुळे कामे मजुरांची वाट पाहत असल्याचे चित्र आहे.
वाचा- शहरातील रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधींचा खर्च गेल्या खड्ड्यात
जिल्ह्यात नऊ लाख तीन हजार ६१७ जॉबकार्डप्रमाणे मजुरांची नोंदणी आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मजुरांची पुन्हा कामावर येण्याची मानसिकता नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारतर्फे दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत धान्याचे मोफत वाटप झाले. त्याचाही फटका रोजगार हमी योजनेला बसला आहे. मोफत धान्य मिळाल्याने अनेकांनी कामावर येण्यास विविध कारणे सांगून नकार दिला आहे.
मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे नोंदणी केलेल्यांपैकी केवळ साडेआठ हजारांपेक्षा जास्तच जॉबकार्ड ॲक्टिव्ह राहिलेले आहेत. नोंदणी केलेल्या मजुरांपैकी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांचे हे प्रमाण अवघे १० टक्केच आहे. ऐन उन्हाळ्यात मजुरांना इतर खासगी कामे नसतात. यामुळे रोजगार हमीची कामे करून गुजराण करण्यावर मजूर भर देतात. नेमके याच काळात राज्यात लॉकडाउन झाले. अनेकांनी मूळगावी स्थलांतर केले.
स्थलांतर रोखणे शक्य व्हावे यासाठी मनरेगांतर्गत मजुरांना स्थानिक परिसरात काम देण्यात येत आहे. रोजगार हमीच्या कामांसाठी जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख तीन हजार ६१७ मजूर कुटुंबांची नोंदणी करण्यात आली असून, या वर्षी प्रस्तावित कामांवर केवळ आठ हजार ६१० मजूर कुटुंबांनी हजेरी लावली आहे. जूननंतर पावसाळा सुरू झाल्याने, तसेच कामे कमी झाल्याने मजुरांच्या संख्येत घट झाली आहे. जुलै ते ऑक्टोबरपर्यंतच्या सरासरीपेक्षा नोव्हेंबरमधील मजुरांची उपस्थिती अत्यंत कमी आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक मजूर दिवाळी सण, कोरोना प्रादुर्भावाच्या निमित्तामुळे कामावर आलेच नाहीत.
आवश्य वाचा- जीवनात अनेक धक्के सहन केले, आता कंटाळा आलाय असे लिहत तरुणीने केली आत्महत्या
आकडे बोलतात...
‘रोहयो’चे नोंदणीकृत मजूर : ९ लाख ३ हजार ६१७
प्रत्यक्ष उपस्थित : ८ हजार ६१०
प्रगतीतील कामे : १९ हजार ५३१
शेल्फवरील कामे : १६ हजार १४१
रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणीच्या केवळ १० टक्के मजूर कामावर येत आहेत. कोरोना संसर्ग व दिवाळीनिमित्त अनेक मजुरांनी कामावर येणे टाळले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतच मजूर कामावर येतील अशी आशा आहे.
-प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना
संपादन- भूषण श्रीखंडे