तपानंतरही क्रीडासंकुल अपूर्णच.. जळगाव जिल्ह्यातील चित्र 

तपानंतरही क्रीडासंकुल अपूर्णच.. जळगाव जिल्ह्यातील चित्र 

डगाव  : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १२ वर्षांपूर्वी मंजूर क्रीडासंकुल अजूनही पूर्णत्वास आलेली नाहीत. १५ पैकी दहा ठिकाणी कामे सुरू आहेत. आता त्यांना पूर्णत्वासाठी तब्बल ९० कोटी रुपये अपेक्षित आहे. चार ठिकाणी अजूनही कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात क्रीडासंकुल खेळाडूंसाठी केव्हा वापरात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

२००८-०९ या वर्षात तत्कालीन आघाडी शासनाने जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडासंकुल मंजूर केले. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र प्रत्यक्षात १५ पैकी फक्त ११ ठिकाणी आतापर्यंत काम सुरू होऊ शकले आहे. चार ठिकाणी अजूनही मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे रेंगाळला हा प्रश्न केव्हा पूर्णत्वास येईल, असा प्रश्न क्रीडाप्रेमींकडून उपस्थित होत आहे. 

क्रीडासंकुलाचे कामे रखडले 
जिल्ह्यात मंजूर असलेले क्रीडासंकुलाचे कामे पूर्णपणे रखडले असल्याचे चित्र आहे. ११ ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. त्यात चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, अमळनेर या ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. येथे प्रत्येकी ९०-९५ लाख रुपये खर्च झाले आहेत. पाचोरा येथे आता जागा मिळाली आहे. मंजुरीसाठी प्रस्ताव क्रीडा संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. जळगाव व जामनेर येथे शासकीय जागा मिळविण्याची कार्यवाही सुरू आहे. बोदवड येथे देय जागेबाबत वाद न्यायप्रविष्ट असल्याने कामाला सुरवात झालेली नसल्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितले. निधीअभावी काम बंद असल्याने या इमारती धूळखात पडल्या आहेत. सद्यःस्थितीत त्या काहीएक उपयोगात येत नसल्याचे चित्र आहे. 

११ क्रीडासंकुलांना हवेत ९० कोटी 
जिल्ह्यात सुरू असलेल्या ११ क्रीडासंकुलांना पूर्णत्वासाठी जवळपास ९० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यात कंसात लागणारा निधी कोटीत ः चाळीसगाव (१०.८३), भडगाव (१२.५७), एरंडोल (१२.२६), धरणगाव (७.५६), रावेर (९.९३), यावल (१०.६६), मुक्ताईनगर (८.१५), भुसावळ (९.८७), अमळनेर (८. ८४), पारोळा (७.४०) निधी लागणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी व्हीजन डॉक्युमेंटशन अंतर्गत तालुका क्रीडासंकुलाचे बांधकाम पूर्णत्वासाठी आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. 

क्रीडासंकुलात काय सुविधा असणार? 
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मंजूर असलेल्या या क्रीडासंकुलामधे बहुउद्देशीय हॉल, विविध खेळाचे मैदान, २००-४०० मीटर धावपट्टी, कार्यालयीन इमारत, पाण्याची व विद्युतीकरण व्यवस्थेचा समावेश आहे. क्रीडासंकुल पूर्णत्वास आल्यानंतर तालुका पातळीवर खेळाडूंना स्थानिक ठिकाणीच सहजरीत्या सुविधा उलपब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने या क्रीडासंकुलांना तत्काळ निधी देऊन कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे. 

निधीअभावी वाढल्या किमती? 
२००८-०९ मध्ये जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात क्रीडासंकुलांना मंजुरी दिली. जेवढा निधी त्यांना दिला. तेवढा खर्च झाला. मात्र उर्वरित कामांना निधी मिळाला नाही. त्यामुळे ही कामे रखडली आहेत. आता खर्च वाढल्याने या क्रीडासंकुलांच्या कामाच्या अंदाजपत्रकात साधारण ५०-६० टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आतातरी यासाठी पूर्ण निधी द्यावा, अशी अपेक्षा आहे. अर्थात, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जोर लावणे आवश्यक आहे. 

जिल्हातील १५ पैकी दहा ठिकाणी क्रीडासंकुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे. पाच ठिकाणी अद्याप काम सुरू व्हायचे आहे. जे अपूर्णावस्थेत आहे. त्यासाठी आवश्यक निधीची मागणी केली आहे. 
- मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडाधिकारी, जळगाव 


निधीअभावी रखडलेल्या क्रीडासंकुलांना पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना एकत्र करून आपण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमाने क्रीडामंत्र्यांची भेट घेऊन तत्काळ निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 
-किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव 

जिल्ह्यातील क्रीडासंकुलांची स्थिती 

तालुका........खर्च झालेला निधी........आवश्यक निधी 
(लाखात) ( कोटीत) 
चाळीसाव........९५..................१०.८३ 
भडगाव...........९०................१२.५७ 
एरंडोल............९५...............१२.२६ 
धरणगाव.........९५.................७.५६ 
रावेर............९५.................९.९३ 
मुक्ताईनगर.......९५...................८.१५ 
भुसावळ..........९५..................९.८७ 
चोपडा............२३..................०० 
अमळनेर.........९०...................८.८४ 
पारोळा.........९५....................७.४० 
यावल.............००...............१०.६६ 
पाचोरा..........काम सुरू झालेले नाही 
जळगाव........काम सुरू झालेले नाही 
बोदवड........काम सुरू झालेले नाही 
जामनेर...... काम सुरू झालेले नाही 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com