
महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या सरकारचे आपण अभिनंदन करत आहोत,
जळगाव : ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या सरकारचे आपण अभिनंदन करत आहोत, असे मत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, की जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यात ठेवीदारांच्या ठेवी देण्यात मोठा अपहार झाला आहे. २०१८ मध्ये याबाबत ठेवीदारांनी माझ्यासह खासदार रक्षा खडसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. ॲड. कीर्ती पाटील यांनी या फसवणुकीबाबत सविस्तर माहितीही दिली होती. मात्र, त्या वेळी त्यांनी या प्रकरणाबाबत काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर आपण तत्कालीन केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे तक्रार केली. वारंवार या प्रकरणाचा पाठपुरावा केला. राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारने याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करतानाच काही जणांना अटकही केली. त्यामुळे आपण या सरकारचे अभिनंदन करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संघटित गुन्हेगारी
‘बीएचआर’ ठेवीदारांच्या ठेवी देण्यातील गैरव्यवहाराची ही संघटित गुन्हेगारी आहे, असे सांगून खडसे म्हणाले, की यात एक- दोन नव्हे तर शेकडो जण गुंतले आहेत. कर्जदारांच्या मालमत्ता विक्रीतही मोठे रॅकेट आहे. ठेवीदारांच्या ठेवी अदा करताना अनेक दलाल तयार झाले. आता पोलिस चौकशीत सर्व माहिती बाहेर येईलच.
चौकशीनंतर घेणार पत्रकार परिषद
‘बीएचआर’ ठेवीदार प्रकरणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आपण आता काहीही बोलणार नाही. मात्र, दोन दिवसांनी आपण याबाबत पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती जनतेसमोर आणणार आहोत, असेही खडसेंनी स्षष्ट केले.
संपादन ः राजेश सोनवणे