शेतकऱ्यांना दिवाळी धमाका 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

राज्यामध्ये यंदा जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत २३ ऑक्टोबरला घेण्यात आला होता. याला २९ ऑक्टोबरच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

जळगाव : जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १९ कोटी ५५ लाख रूपये इतकी नुकसान भरपाई मिळाली आहे. दिवाळीपूर्वीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने प्राप्त झालेल्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
राज्यामध्ये यंदा जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत २३ ऑक्टोबरला घेण्यात आला होता. याला २९ ऑक्टोबरच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. यात जिराईत पिकांसाठी प्रती हेक्टर १० हजार तर बागाईत पिकांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार अशी मदत अधिकतम दोन एकरसाठी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांना २ हजार २९७ कोटी सहा लाख व ३७ हजार इतक्या रूपयांची तरतूद करण्यात आली होती. 
दरम्यान, या संदर्भात महसूल व वन विभागाने शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत प्रदान केली आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी १९ कोटी ५५ लाख रूपयांचा प्रस्ताव पाठविला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली आहे. यामुळे त्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे. 

वाटप करण्यात येणारा मदतनिधी तालुकानिहाय असा 
जळगाव - ३ कोटी ८१ लाख ३८ हजार, धरणगाव- २ कोटी १७ लाख, जामनेर- १० लाख ३६ हजार, भुसावळ- ४१ लाख ८७ हजार, बोदवड-७३ लाख २ हजार; मुक्ताईनगर- ४१ लाख ३६ हजार, एरंडोल- ३ कोटी २१ लाख २७ हजार, पारोळा- २५ लाख ३९ हजार, यावल- १ कोटी ११ लाख, ९१ हजार, रावेर- १ कोटी १३ लाख, ३२ हजार, अमळनेर- १ कोटी ८४ लाख ५० हजार, चोपडा २ कोटी ९९ लाख ९१ हजार, पाचोरा-३ कोटी १४ लाख, भडगाव- २ कोटी १४ लाख, चाळीसगाव ५८ लाख. 

प्रशासनाचे युद्धपातळीवर काम 
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिवाळीच्या आधीच देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यानुसार महसूल प्रशासन अहोरात्र काम करून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मदत ट्रान्स्फर करीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer diwali dhamaka compensation heavy rain