esakal | शेतकरी संघटनेसह कॉंग्रेसचे कांदा निर्यातबंदीवर जिल्ह्यात आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी संघटनेसह कॉंग्रेसचे कांदा निर्यातबंदीवर जिल्ह्यात आंदोलन 

केंद्र शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या प्रती व कांदा जाळून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. निर्यातबंदी मागे घ्यावी.

शेतकरी संघटनेसह कॉंग्रेसचे कांदा निर्यातबंदीवर जिल्ह्यात आंदोलन 

sakal_logo
By
मिलींद वानखेडे

जळगाव : केंद्र सरकारने अचानक लागू केलेली कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेसह कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात यावल येथे केंद्राच्या अध्यादेशाच्या प्रतीची होळी करण्यात आली, तर जळगाव, रावेर येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भुसावळ, एरंडोल व पारोळा तालुका पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून, कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आक्रमक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकरीविरोधी निर्णय घेतल्याने मोदी सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉंग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. कांदा निर्यातबंदीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा; अन्यथा जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपाध्यक्ष अशोक खलाणे, खजिनदार सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, जमील शेख, ‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, श्‍याम तायडे, मनोज सोनवणे, मनोज चौधरी, दीपक सोनवणे, महेश पाटील, मयूर पाटील, कुणाल पाटील, शुभम खंबायतकर, पंकज पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावलमध्ये शेतकरी संघटना रस्त्यावर 
यावल ः येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी (१६ सप्टेंबर) शेतकरी संघटनेतर्फे केंद्र शासनाने कांद्यावर लावलेल्या निर्यातबंदीसंदर्भात आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या प्रती व कांदा जाळून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. निर्यातबंदी मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. ‘कांदा निर्यातबंदी उठवलीच पाहिजे, केंद्र सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केंद्र शासनाने पाच जूनला आवश्यक वस्तू कायद्यातून कांदा व बटाटा वगळला होता. तेव्हा या निर्णयाचे शेतकरी संघटनेमार्फत स्वागत करण्यात आले. मात्र, आता १४ सप्टेंबरला केंद्र शासनाचे शब्द फिरविला आणि रातोरात कांदा निर्यातबंदी केली. केंद्र शासनाने निर्यातबंदी करीत शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. या वेळी शेतकरी संघटनेचे खानदेश विभागप्रमुख कडू (आप्पा) पाटील, प्रमोद पाटील, पिंटू काटे, रमेश चौधरी (नायगाव), नारायण चौधरी, उदय चौधरी, बापूराव काटे, निर्मल चोपडे, भूषण फेगडे आदींची उपस्थिती होती. 

एरंडोल कॉंग्रेसतर्फे निवेदन 
एरंडोल : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथे देण्यात आला. कॉंग्रेसतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे भाव कोसळले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. केंद्र सरकारने मात्र तीन महिन्यांतच घोषणेतून घूमजाव केले आहे. आंदोलनाचा इशारादेखील निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, शहराध्यक्ष संजय भदाणे, मदनलाल भावसार, प्रा. आर. एस. पाटील, शेख सांडू शेख मोहम्मद, राकेश चौधरी, जहीर अब्बास शेखचांद पिंजारी, रफिक रज्जाक पिंजारी आदी उपस्थित होते. 

पारोळ्यात कॉंग्रेस आक्रमक 
पारोळा : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नायब तहसीलदार शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, उपाध्यक्ष संजय पाटील, अपंग आघाडीचे अध्यक्ष सुरेश भोई, मागासवर्ग आघाडीचे अध्यक्ष आनंद अहिरे, विश्वास पाटील आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 
 

रावेरला घोषणाबाजी 
रावेर : कांदा निर्यातबंदी मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे आज तहसीलदारांना देण्यात आले. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्यातबंदी व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला. निवेदनावर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अनुसूचित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा मोरे, अनुसूचित आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवर्णे, काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पाचपांडे, शहराध्यक्ष डॉ. शब्बीर, सेवादलाचे तालुकाध्यक्ष सूर्यभान चौधरी, संतोष पाटील, रामदास लहासे, प्रकाश सूरदास, अयुबखान पठाण, ॲड. योगेश गजरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

भुसावळला काँग्रेसतर्फे निषेध 
भुसावळ : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी घोषित केली आहे. त्यामुळे शेतमालास मिळणाऱ्या भावात विक्रमी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या निषेधार्थ काँग्रेसतर्फे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले, तसेच सरकारने ही निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली आहे. प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी योगिता गोरडे यांच्याशी चर्चा करून जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती आघाडीतर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटिल यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, इस्माईल गवळी आदी उपस्थित होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे