यंदा बाप्पाचे ऑनलाईन घ्यावे लागणार भक्तांना दर्शन !

देविदास वाणी
Friday, 14 August 2020

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या आहेत.

जळगाव ः श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. पूजा व आरती करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळासाठी मूर्ती ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटांच्या मर्यादेत असावी. श्रीगणराय दर्शन सुविधा ऑनलाइन, वेबसाइट, फेसबुक, केबलद्वारे उपलब्ध करून द्यावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज येथे दिल्या. 

सार्वजनिक गणेशोत्सव २०२० ची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधीक्षक डॉ. नीलोभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, उपायुक्त संतोष वाहुळे आदी सहभागी झाले होते. 

श्री. राऊत म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांची माहिती यंत्रणेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करुन द्यावी. त्याचबरोबर या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 

या दिल्या सूचना 
- कोविडमुळे सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम नको 
- कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविषयक उपक्रम राबवावे 
- रक्तदान, प्लाझ्मा दानविषयक जनजागृती करावी 
- रुग्णांना मोफत सकस आहार पुरविणे, आरोग्य तपासणीसाठी प्रशासनास सहकार्य करावे 
 
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनसाठी मदती करा 
कोरोना बाधित रुगणांच्या रक्तामधील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यामुळे त्यांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करुन देणे आवश्यक असते. ग्रामपंचायत स्तरावर किवा प्राथमिक आरोग्य केंदस्तरावर ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांसाठी तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपयोगी ठरते. जिल्ह्यातील प्रत्येक गावस्तरावर हे मशीन असावे यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी श्री. राऊत यांनी गणेश मंडळांना केले आहे. 
 

गणेश मंडळाना परवानगी आवश्यक 
शासनाच्या नियमांनुसार सार्वजनिक गणेश मंडळांना मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. मंडपाची उभारणी करताना रस्ता, फुटपाथ अथवा कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी. मूर्ती विक्रेत्यांसाठी जी. एस. ग्राउंड व सागर पार्क या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त कुलकर्णी यांनी दिली. 
 

संपादन-भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ganesh mandals should give ganpati online by information Collector