esakal | सत्ताकेंद्र स्वत:कडे राखण्यात गुलाबरावांची कसोटी !
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ताकेंद्र स्वत:कडे राखण्यात गुलाबरावांची कसोटी !

जिल्ह्यातील शिवसेना पूर्णपणे ‘इन्टॅक्ट’ आहे, असेही नाही. चार व एक अपक्ष असे पाच आमदार असले तरी पाचही आमदारांच्या वाटचालीची दिशा वेगवेगळी आहे.

सत्ताकेंद्र स्वत:कडे राखण्यात गुलाबरावांची कसोटी !

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगावः फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेकडून गुलाबराव पाटलांकडे राज्यमंत्रिपद होते. पण, त्या मंत्रिपदाला ते ‘चीडी मारायची बंदूक’ म्हणायचे. आता ठाकरे सरकारमध्ये गुलाबराव कॅबिनेट मंत्री आहेत. तरीही विरोधी पक्ष व शिवसेना स्टाइल म्हणून त्यांची जी तोफ चालायची, ती आता धडाडत नाही. सरकारमध्ये असण्याचा तो परिणाम असेल... अशा स्थितीत खडसेंचे पुनर्वसन होऊन ते मंत्री अथवा अगदी आमदारही झाले तरी जिल्ह्यातील सत्ताकेंद्राचा दोलक गुलाबरावांकडून खडसेंकडे झुकण्याची शक्यता अधिक... हा दोलक स्वत:कडेच राखण्यासाठी खानदेशी मुलूखमैदान तोफेची कसोटी लागणार, एवढे मात्र निश्‍चित! 


गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. जिल्ह्यातील अकरापैकी सात जागा लढवून भाजपला चारच जागा राखता आल्या. उलटपक्षी शिवसेनेने लढविलेल्या जळगाव ग्रामीण, पाचोरा, चोपडा व एरंडोल अशा चार जागा लढवत शंभर टक्के यश मिळविले. भरीस भर म्हणून मुक्ताईनगरातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यामुळे आकड्यांच्या चित्रात सध्यातरी जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव आहे. 
खडसेंच्या पक्षांतराची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याचा शिवसेनेला फटका बसू नये म्हणून संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचा दौरा करत चाचपणी केली. सत्तेतला पक्ष व सर्वाधिक आमदार असल्याने शिवसेनेवर ‘खडसे फॅक्टर’ परिणाम करेल, असे सध्यातरी दिसत नाही. 
असे असले तरी जिल्ह्यातील शिवसेना पूर्णपणे ‘इन्टॅक्ट’ आहे, असेही नाही. चार व एक अपक्ष असे पाच आमदार असले तरी पाचही आमदारांच्या वाटचालीची दिशा वेगवेगळी आहे. दोन टर्म बाजूला राहिल्याने सीनिअर असूनही चिमणआबांना मंत्रिपद मिळू शकले नाही, हे त्यांचं दुखणं. त्यामुळे गुलाबभाऊंशी जुळवून घेण्यात त्यांना मोठी अडचण. तिकडे पाचोऱ्याचे आमदार किशोरआप्पांची खडसेंशी जवळीक. चोपड्यात लता सोनवणे आमदार असून, त्यांचे पती माजी आमदार चंदूअण्णा यांचे व्यक्तित्त्वही स्वयंभू. अशा स्थितीत गुलाबभाऊंचे पालकमंत्री म्हणून ‘एकला चालो रे’ अभियान सुरू आहे. मंत्रिपद असले तरी जिल्हा परिषद, जळगाव महापालिका व बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या हाती आहेत. त्यामुळे या संस्थांवर शिवसेना व पर्यायाने मंत्रिपद असूनही गुलाबभाऊंचा प्रभाव नाही. 


अशा स्थितीत खडसे राज्यात सत्तेत व सत्तेच्या वाट्यात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आज कुठलेही संवैधानिक पद नसले तरी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा ओघ त्यांच्याकडे सुरू झालाय. खुद्द महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक, विरोधी पक्षनेते गुलाबभाऊंना कमी खडसेंना अधिक भेटताना दिसताहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पुनर्वसन म्हणून खडसेंकडे विधान परिषद सदस्यत्व, मंत्रिपद अथवा दुसरं मोठं पद आल्यास भाजपतील त्यांचे समर्थक, राष्ट्रवादीतील स्वागत करणारे चाहते आणि आपल्या समस्येचे समाधान म्हणून कट्टर शिवसैनिक खडसेंकडे वळल्यास आश्‍चर्य वाटायला नको. ही स्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल आणि स्वत:कडील सत्ताकेंद्र हलवू द्यायचे नसेल, तर गुलाबभाऊंना त्यांच्या मूळ स्टाइलनेच कार्यकर्त्यांची व जनतेचीही कामे करावी लागतील. हे सत्ताकेंद्र स्वत:कडे राखण्यासाठी गुलाबरावांची जशी कसोटी लागणार आहे, तशी परीक्षा शिवसेनेचीही आहे. या कसोटीवर गुलाबभाऊ किती खरे उतरतात, हे येणाऱ्या काही दिवसांत दिसून येईल, त्याची प्रतीक्षा करूया..! 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image