खडसेंनी ‘आर पार की लढाई’ लढावी ः गुलाबराव पाटील 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता ते म्हणाले, खडसे युद्धावर तर जातात, मात्र युद्ध पूर्ण लढत नाही.

जळगाव : ग्रामीण भागातून एखादा नेता वर यायला नको म्हणून फडणवीस व मंडळीने खडसेंसारखा उत्तर महाराष्ट्रातला नेता संपविला, असा आरोप करत खडसेंनी आता माघार न घेता ‘आर पार की लढाई’ लढावी, असा सल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. 
आज जळगावात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता ते म्हणाले, खडसे युद्धावर तर जातात, मात्र युद्ध पूर्ण लढत नाही. त्यांनी यापुढे आता ‘आर पार की लढाई’ केली पाहिजे. खडसेंसारख्या दिग्गज ओबीसी नेत्याला फडणवीस व मंडळीने संपविले. उत्तर महाराष्ट्रातले नेतृत्व पुढे यायला नको, ग्रामीण भागातील कुणी नेता व्हायला नको म्हणून यांचे कारस्थान सुरु आहे. आता या वादातून खडसेंनी शेवटपर्यंत लढावे आणि ‘एक घाव दोन तुकडे’ करावे, असा सल्लाही गुलाबराव पाटलांनी दिला. 

कंगणाचा वाद मुद्दाम काढलेला 
राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपने कंगणा रणौतचा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला आहे. आमचे सरकार विविध पातळीवर चांगले काम करत असून ते सहन होत नसल्याने व विरोधकांकडे काही मुद्दाच नसल्याने हा वाद केवळ पुढे करण्यात आला आहे, असेही पाटील म्हणाले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gulabrao patil statement eknath khadse