५० लाखांच्या गुटखा जप्तीप्रकरणी ‘खाकी’च दोषी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. यात तब्बल सुमारे ५० लाखाहून अधिक किमतीचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला होता. 

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पकडलेल्या गुटखा प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत प्रमुख अधिकाऱ्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. यात तब्बल सुमारे ५० लाखाहून अधिक किमतीचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला होता. 

आमदारांचा पाठलाग, फिर्याद 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहुणबारे ठाण्याच्या हद्दीत हा गुटखा पकडलेला असताना तो त्याठिकाणी जमा न करता जळगावात का आणला? त्यासाठी ट्रकचा पाठलाग करत आमदार मंगेश चव्हाण यांनी हा प्रकार उघडकीस आणला. नंतर त्यांच्याच फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला होता. 

अधीक्षकांकडून चौकशी 
या प्रकरणात पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी चौकशी करून तब्बल ८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यात मेहुणबारेचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 
 
निलंबित कर्मचारी असे 
मेहुणबारे ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, प्रवीण हिवराळे, महेश पाटील, मनोज दुसाने, मुख्यालयाचा नटवर जाधव व मेहुणबारे पोलिस ठाण्याचे रमेश पाटील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gutkha seized matter sevan police dismiss