esakal | सहा गावांसाठी हतनूरचे आवर्तन सुटणार
sakal

बोलून बातमी शोधा

Hatnur dam

सहा गावांसाठी हतनूरचे आवर्तन सुटणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणीटंचाई उद्‌भवू नये, यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हतनूर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे २.९२ दशलक्ष घनफूट बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या गावांची पाणीटंचाईतून सुटका झाली असून, त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. (Hatnur cycle released for six villages Water scarcity)

हेही वाचा: कारभारी त्रस्त..निधीअभावी अडचण; ग्रामविकासाचा खोळंबा

जळगाव तालुक्यातील ममुराबाद, विदगाव, आवाड, खापरखेडा, तुरखेडा आणि नांद्रा खुर्द या गावांना पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी या गावांतील सरपंच व इतर ग्रामस्थांनी शनिवारी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन त्यांना हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी २.९२ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करून, हतनूर धरणातून हतनूर उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यास तातडीने मान्यता दिली. या गावांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागास दिले होते.

पाहणी पथक तयार

जिल्हाधिकारी राऊत यांनी बिगरसिंचन पाणी वापर संस्थेने आवर्तन कालावधीत पाहणी पथक व वाहन निरीक्षणासाठी तयार ठेवावे. आवर्तन कालावधीत पुरेसा कर्मचारीवर्ग निरीक्षणाकरिता उपलब्ध करून द्यावा, या अटींवर या गावांसाठी हतनूर उजव्या कालव्याद्वारे बिगरसिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.