सागर पार्क’ लाटण्यासाठी शंभर कोटींची सुपारी! 

कैलास शिंदे
Monday, 7 December 2020

सागर पार्कबाबत महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला आहे.

जळगाव : महापालिकेच्या मालकीचे असलेल्या सागर पार्क मैदानाचा भूखंड लाटण्यासाठी शंभर कोटींची सुपारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मंत्रालयातून महापालिका आयुक्तांवर दबाव येत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव येथे केला. भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महापौर भारती सोनवणे, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. राधेश्‍याम चौधरी आदी उपस्थित होते. आमदार भोळे म्हणाले, की शहरातील सागर पार्क ही मध्यवर्ती जागा आहे. सागर पार्कबाबत महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता ही जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, त्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम तसेच खेळही होत आहेत. महिला वकील आपण मंत्रालयातून आले असल्याचे सांगून या संबधितांचा तुम्हाला फोन आला का? असेही सांगत असल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला. 

यापूर्वीही दबाव आणला 
यापूर्वीही एका शेतकऱ्याच्या घरकुलासाठी वापरलेल्या जागेचे प्रकरण होते. या प्रकरणात महापालिकेने पूर्ण पैसे दिल्यानंतरही एका वकिलाने या संदर्भात शेतकऱ्यांच्या नावाने पुन्हा दावा दाखल केला. आम्हाला कमी पैसे मिळाल्याचे सांगितले आहे. हा जनतेचा पैसा आहे. महापालिकेने या प्रकरणात अगोदरच पैसा दिला आहे. संबंधित वकिलांची नार्को टेस्ट करून हा पैसा त्या शेतकऱ्याला मिळाला काय? याची माहिती घ्यावी, असे भोळे म्हणाले. 

वॉटर ग्रेसला प्रशासनाची मंजुरी 
जळगाव महापालिकेतील ‘वॉटर ग्रेस’ सफाई मक्त्याबाबत भोळे म्हणाले, की या प्रकरणात आमचे नेते गिरीश महाजन यांचा संबंध जोडला जात आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. वॉटर ग्रेस सफाई मक्त्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. यात भाजप किंवा आमच्या नेत्यांचा कोणताही संबंध नाही. दरम्यान, शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेतील ४२ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. राज्यात भाजपचे शासन असताना जळगाव महापालिकेसाठी त्या वेळी तब्बल १४२ कोटी रुपये आणले होते. तसेच शहरातील खड्डे बुजविण्यासाठी ४२ कोटींचा प्रस्ताव करण्यात आला होता. आजही तो प्रस्ताव प्रलंबित आहे. 

पाकिटे घेतलेल्यांची नावे सांगा : कैलास सोनवणे 
‘वॉटर ग्रेस’च्या मक्तेदाराकडून सत्ताधारी नगरसेवकांना पैशाची पाकिटे देण्यात येत असल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात येत आहे. याबाबत नगरसेवक कैलास सोनवणे म्हणाले, की वॉटर ग्रेस आणि आमचा कोणताही संबंध नाही. उलट ‘वॉटर ग्रेस’ने माझ्यावर वैयक्तिक गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याच्या मक्त्यासाठी नगरसेवकांना पाकिटे देण्याचा संबंधच येत नाही आणि विरोधक आरोप करत असतील, तर त्यांनी नगरसेवकांची नावे जाहीर करावी आम्ही कारवाई करू, असे आव्हान सोनवणे यांनी केले. 

उपमहापौरांची ‘ट्वेंटी’ आमची ‘कसोटी’: सोनवणे 
उपमहापौर सुनील खडके जळगाव शहरात पाहणीदौरा करीत आहेत. त्याबाबत नगरसेवक कैलास सोनवणे म्हणाले, की त्यांचा कालावधी कमी असल्यामुळे त्यांना जनतेसाठी कमी वेळेत काम करून दाखवायचे आहे, त्यामुळे ते दौरा करून ‘ट्वेंटी-२०’ प्रमाणे काम करीत आहेत. आम्हाला वेळ असल्यामुळे आम्ही क्रिकेटमधील कसोटीप्रमाणे हळूहळू जनतेच्या कामाची ‘कसोटी’ खेळत आहोत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon hundred crore betel nut to grab the land of municipal corporation's Sagar Park