
भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येत असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. या दोन मार्गांतील महत्त्वाचा मार्ग हा ‘इंडस व्हॅली’ मार्ग म्हणून ओळखला जातो.
जळगाव : जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त पक्षीमित्र, तज्ज्ञांनी १० ऑक्टोबरला जामनेर तालुक्यात दौरा करून काही पक्ष्यांच्या महत्त्वपूर्ण नोंदी घेतल्या. याअंतर्गत ५२ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली असून, यात २० स्थलांतरित पक्षी नोंदविण्यात आले. पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी या दौऱ्यात शहापूर, पिंपळगाव, तोंडापूर परिसरातील पक्ष्यांचे निरीक्षण केले.
या विदेशी पक्ष्यांच्या नोंदी
युरोप, बलुचिस्तान, पाकिस्तान, हिमालय या भागातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांत काळा थिरथिरा, दगडी गप्पीदास, पांढरा धोबी, करडा धोबी, पिवळा धोबी, साधा पाणलाव, ब्लिथीची तीरचिमणी, धान वटवट्या, श्वेतकंठी वटवट्या, गुलाबी मैना, साधी तुतारी, टेमिंची तुतारी, चिखली तुतारी यांचा समावेश आहे.
स्थानिक पक्षी असे
स्थानिक स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांत कवडा झुडपी गप्पीदास, रंगीत करकोचा, भोंडल्या फोड्या, तिरंदाज, राखी बगळा अशा जातींचा समावेश आहे.
काही महत्त्वपूर्ण नोंदी
युरेशियन नीलपंख हा पक्षी स्थलांतर करताना युरोपातून भारतामार्गे आफ्रिकेत जातो, त्यामुळे त्याचे दर्शन काही दिवसांसाठी असते. त्याचेही सुखद दर्शन झाले. रेशाळ बगळा हा पक्षी अनियमित पाहुणा आहे, तो अचानक भेटला. चक्रवाक, पट्ट कदंब, नकटा, चक्रांग, नदी सूरय, काळ्या शेपटीचा लगुजा, कैकर, युरेशियन दलदल हरीण, विविध भारीट, निलांग, फ्लेमिंगो असे अनेक पाहुणे पक्षी अद्याप आलेले नाहीत, त्यांची प्रतीक्षा आहे.
‘इंडस व्हॅली’ मार्ग
भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येत असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. या दोन मार्गांतील महत्त्वाचा मार्ग हा ‘इंडस व्हॅली’ मार्ग म्हणून ओळखला जातो. हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला, पाणथळीच्या पक्ष्यांचा चौथ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. भारतात येणारे बहुतेक पक्षी या मार्गाने येतात. तसेच पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा ईशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो, अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.
संपादन- भूषण श्रीखंडे