जिल्ह्यात 55 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ...अमळनेरमध्ये पुन्हा 11 कोरोनाबाधित रुग्ण ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

उद्यापासून पाचवा लॉकडाउन सुरू होणार असल्याने "रेड झोन'मध्ये किती प्रमाणात शिथिलता मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे 55 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, जिल्हाभरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 676 वर पोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 77 जणांचा मृत्यू झाला असून, 258 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशासह राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण राज्यात असल्याने प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही जिल्ह्यात दररोज नवनवीन भागात रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज दिवसभरात कोरोना संशयित 270 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यातील 215 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी सुमारे 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 

अमळनेरात पुन्हा प्रादुर्भाव 
सुरवातीला जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरू झाला होता. अमळनेरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या शंभरी पार झाल्यानंतर काही दिवस याठिकाणी लॉकडाउनची व संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटल्याची चिन्हे दिसत होती. मात्र, आज अमळनेरात पुन्हा 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या ठिकाणी पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे दिसून आले आहे. 

नवे रुग्ण कुठे? 
जिल्हाभरात आज भुसावळ 11, जळगाव ग्रामीण 2, भडगाव 6, चोपडा 6, एरंडोल 3, अमळनेर 11, यावल 4, रावेर 8 व जामनेर 1 असे एकूण 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

कोरोनाचा स्फोट होणार? 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. उद्यापासून पाचवा लॉकडाउन सुरू होणार असल्याने "रेड झोन'मध्ये किती प्रमाणात शिथिलता मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. एकीकडे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे, त्यातच देशभरातील मृत्यू दरापेक्षा जिल्ह्यातील मृत्यूदर 11.49 टक्के म्हणजेच सर्वाधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यास कोरोनाचा स्फोट होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

भुसावळमध्ये सर्वाधिक मृत्यू 
जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 160 रुग्ण भुसावळमध्ये आढळून आले असून, यातील 23 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. भुसावळात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येप्रमाणेच त्या ठिकाणांवरील मृत्यूचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या तालुक्‍यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूकडे लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon increase of 55 positive patients in the district