दिलाशानंतर रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; दीडशेवर रुग्ण आढळले !

सचिन जोशी
Monday, 19 October 2020

गेल्या काही दिवसांपासून कमी रुग्ण आढळून येत असल्याने चाचण्याही कमी झाल्या होत्या. रविवारी दोन हजार चाचण्यांमध्येही अवघे ६० रुग्ण आढळून आले.

जळगाव : रविवारी (ता. १८) अवघे ६० कोरोना रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी (ता. १९) पुन्हा ही संख्या तिपटीने वाढून १५२ रुग्ण दिवसभरात समोर आले. त्याबरोबरीने जवळपास १६९ रुग्ण बरेही झाले. गेल्या २४ तासांत तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्युदरात कोणतीही घट झाली नाही. 

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोना संसर्गाच्या आकड्यांनी दिलासा दिला आहे. नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत असून, बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सोमवारी प्राप्त अहवालात १५२ नवीन रुग्ण समोर आल्याने एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ४१ झाली आहे, तर १६९ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्यांचा आकडा ४९ हजारांच्या टप्प्यात आहे. गेल्या २४ तासांत तीन रुग्णांचा बळी गेला. 

चाचण्या साडेतीन हजारांवर 
गेल्या काही दिवसांपासून कमी रुग्ण आढळून येत असल्याने चाचण्याही कमी झाल्या होत्या. रविवारी दोन हजार चाचण्यांमध्येही अवघे ६० रुग्ण आढळून आले. मात्र, सोमवारी ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे तब्बल साडेतीन हजारांवर अहवाल प्राप्त झाले. त्यांपैकी १५२ पॉझिटिव्ह व तीन हजार ४८४ अहवाल निगेटिव्ह आले. 

जळगावात ५७ रुग्ण 
जळगाव शहरात पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. रविवारी केवळ सहा रुग्ण समोर आल्यानंतर सोमवारी तब्बल ५७ रुग्ण आढळले. अन्य ठिकाणचे रुग्ण असे : जळगाव ग्रामीण ७, भुसावळ २४, अमळनेर ९, चोपडा १४, पाचोरा ७, भडगाव ३, यावल ६, एरंडोल १, जामनेर ८, चाळीसगाव ३, बोदवड २, रावेर ११.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon increase in the number of corona patients has created an atmosphere of concern in the district