पून्हा चिंता वाढली; कोरोना बाधीत रुग्ण आणि मृत्यू वाढले 

सचिन जोशी
Wednesday, 18 November 2020

तीन हजार अहवाल प्राप्त झाले. म्हणजे चाचण्या वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच नव्या बाधितांची संख्याही वाढली. मात्र, दुसरीकडे एकाच दिवसात चौघा रुग्णांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोर पुन्हा चिंतेचे वातावरण आहे.

जळगाव : दोन महिन्यांपासून नियंत्रणात असलेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १८) वाढलेल्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर रोजच्या तुलनेत रुग्ण आणि मृत्यूही वाढल्याचे दिसते. जिल्ह्यात ४९ नवे बाधित आढळून आले असून, दिवसभरात चौघा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढण्याची चिन्हे आहेत. 

आवश्य वाचा- प्रसाद लाड यांनी जनतेतून आधी निवडून दाखवावे- एकनाथ खडसे -

दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत तर चाचण्याही कमी आणि तुलनेते रुग्णही मर्यादित स्वरुपात आढळून येत आहेत. बुधवारी मात्र जिल्ह्यातील नव्या बाधितांची संख्या पुन्हा पन्नाशीपर्यंत पोचली. जिल्ह्यात ४९ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ८९१पर्यंत पोचली. तर, दिवसभरात ५९ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांची संख्याही ५२ हजार २३८च्या घरात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट जवळपास ९७ टक्क्यांपर्यंत (९६.९३) पोचला आहे. 

चौघांच्या मृत्यूने चिंता 
बुधवारच्या नोंदीत जवळपास तीन हजार अहवाल प्राप्त झाले. म्हणजे चाचण्या वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच नव्या बाधितांची संख्याही वाढली. मात्र, दुसरीकडे एकाच दिवसात चौघा रुग्णांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोर पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार २८४ जणांचे मृत्यू झाले असून, हे प्रमाण २.३८ टक्क्यांवर आहे. 

असे आज आढळले रुग्ण 

आज जळगाव शहरात १५, भुसावळला ११, पाचोऱ्यात ३, यावल तालुक्यात ४, जामनेरला ३, मुक्ताईनगरला ४ व अन्य काही ठिकाणी प्रत्येकी १ असे रुग्ण आढळून आले. सध्या सर्वाधिक १३३ सक्रिय रुग्ण जळगाव शहरात असून त्याखालोखाल ५७ रुग्ण भुसावळ तालुक्यात आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon increased morbidity and mortality in corona infections