
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी झालेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे विस्थापित झालेले परप्रांतीय कामगार आपापल्या गावी, प्रांतात परतले होते. ते आता लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आपल्या कामावर परतू लागले आहेत. जवळपास 20 टक्के मजूर कामावर हजर झाले असून, अद्याप मोठ्या वर्गाची प्रतीक्षा कायम आहे. जे मजूर परतले आहेत, त्यामुळे उद्योगांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये स्थानिक कामगारांच्या बरोबरीने परप्रांतीय मजूर कामावर आहेत. जळगाव शहरातील एमआयडीसीत चटई, डाळीवरील प्रक्रिया, पीव्हीसी पाइप- ठिबक आदी उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. अन्य उद्योगांत स्मॉल स्केल इंडस्ट्रीतील इंजिनिअरिंग युनिटही बऱ्यापैकी आहेत. तर जिल्ह्यात कापसाच्या जिनिंग फॅक्टरींची संख्या चांगली आहे. औद्योगिक विकासाचा वाटा मुख्यत्वे जळगाव शहरातील एमआयडीसीकडेच आहे. त्यात प्रामुख्याने डाळ, चटई उद्योगांत परप्रांतीय मजूर आहेत.
लॉकडाउनचा फटका
24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन झाले. त्यात सर्व उद्योग बंद झाले. त्यातून जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व कृषी आधारित उद्योगांना वगळले होते. त्यामुळे जळगाव एमआयडीसीतील डाळ उद्योग अविरत सुरूच होता. मात्र, त्यातील परप्रांतीय मजूर गावी परतल्याने या उद्योगालाही मोठा फटका बसला. महिनाभरापेक्षा अधिक काळ पीव्हीसी पाइप- ठिबक उद्योगही बंद होते. दोन मेपासून व काही उद्योग मे महिन्याच्या पंधरवड्यात काही प्रमाणात सुरू झाले. डाळ उद्योगही सुरू झाला. सद्य:स्थितीत सर्वच उद्योग रुळावर येऊ लागले आहेत. मात्र, त्यांना कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.
परप्रांतीय कामगार परत
या स्थितीत आता गावी निघून गेलेले परप्रांतीय कामगार आपल्या उद्योगांवर परतू लागले आहेत. अनेकांनी आपल्या कंपनी मालकांशी संपर्क साधून येण्याची व्यवस्था करून घेतली. तर काहींना परतण्यासाठी वाहनाची तसेच परवानगीची अडचण येत असल्याने त्यांना कामावर हजर होता येत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. काही कामगार परतू लागल्याने उद्योगांना दिलासा मिळाला असून, उद्योग पूर्ण क्षमतेने नसले तरी मर्यादित क्षमतेत सुरू झाले आहेत.
संसर्ग वाढतोय तरीही..
गेल्या महिनाभरात जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढलांय. बाधितांचा आकडाही वाढतोय. अशा स्थितीत कंपन्या, व्यवसाय हळूहळू सुरू होताहेत. त्यामुळे वाढत्या धोक्यातही कामगार परतू लागले आहेत. जुलै महिन्यात कंपन्यांमधील परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात कामावर परततील, असे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.