घरपट्टीचा भरणा नाही; डोंगर कठोरा ग्रामपंचायतीचे बारा सदस्‍य अपात्र

देवीदास वाणी
Thursday, 10 December 2020

डोंगर कथोरा ग्रामपंचयतीचे 13 सदस्य निवडून आले होते. 2019-20 चे वार्षिक दप्तर तपासणी यावलचे गटविकास अधिकारी व ग्रा.पं. विस्तार अधिकारी यांनी केली होती.

जळगाव : शासकीय कराच्या रकमेचा (घरपट्टी) भरणा मुदतीत केला नसल्याने डोंगर कठोरा (ता.यावल) येथील ग्रामपंचायतीच्या
बारा सदस्यांना अपात्र करण्यात आले. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिले असल्‍याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी अ‍ॅड. हरूल देवरे यांनी दिली

डोंगर कठोरा ग्रामपंचयतीचे 13 सदस्य निवडून आले होते. 2019-20 चे वार्षिक दप्तर तपासणी यावलचे गटविकास अधिकारी व ग्रा.पं. विस्तार अधिकारी यांनी केली होती. या तपासणीत आढळून आले, की सरपंच सुमनबाई इच्छाराम वाघ यांनी फक्त मुदतीमध्ये शासकीय कराच्या रकमेचा (घरपट्टी) भरणा मुदतीत म्हणजे 90 दिवसाच्या आत केला आहे. उर्वरीत उपसरपंच यांच्यासह 12 सदस्यांनी मुदतीत भरणा केला नसल्याने 12 सदस्यांना अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी आज दिले आहे.

सीईओंनी दिली होती तक्रार
काही सदस्यांनी आजपावेतो कर भरणा केलेला नसल्याचे आढळून आल्यानंतर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 14 (ह ) प्रमाणे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची वेळोवेली सुनावणी करण्यात आली होती. 

सदस्‍यांचे आद्यकर्तव्य
जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतीनिधींचे कराचा भरणा करणे आद्यकर्तव्य असतांनाही आपल्या कर्तव्यात कसुर केला आहे व लोकप्रतिनिधी यांच्याकडून कराच्या रकमा उशिरा भरणे व भरण्यास टाळटाळ करणे अपेक्षित नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आला. कराची पावती मिळूनही मुदतीत कर भरणा न केल्यामुळे 12 सदस्यांना निवडणूक लढविण्यासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. ज्या सदस्यांनी आजपावेतो कर भरणा केलेला नाही त्यांना मुळ रकमेवर 5 टक्के नोटिस फि, 5 टक्के दंड व संपुर्ण रकमेवर 5 टक्के व्याज आकारणी करून फेर कराची रकमेची पावती देण्याचे आदेश यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना देण्यात आला आहे.

यांच्यावर कारवाई
सुनावणी दरम्यान आढळून आले की, उपसरपंच नितीन भागवत भिरूड यांच्यासह सदस्य रत्नदीप मुरलीधर सोनवणे, यदुनाथ प्रेमचंद पाटील, प्रीती विनोद राणे, यांनीच अनुक्रमे 96, 162, 177 दिवस उशिराने कर भरणा केला आहे. उर्वरीत सदस्य निसार सरदार तडवी, प्रितम प्रकाश राणे, चंद्रकांत जगन्नाथ भिरूड, शशिकला विजय भिरूड, हलिमा रफिक तडवी, रेखा लुकमान तडवी, हसिना सुपडू तडवी, अनिता मनोहर बाऊस्कर यांनी आदेश पारीत होईपावेतो कराचा भरणा केलेला नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ineligible gram panchayat member no house rent payment