सेल्फीचा मोह आवरेना मग अशात गेला तोल, शोधायला लागले ३८ तास

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

नदीपात्रात उतरून मोबाईल फोन मध्ये सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना पाय घसरून राजेश खाली कोसळला. घटनेचे वृत्त कळताच पोलिस पाटलांनी तालुका पोलिसांसह, महापालिकेच्या आत्पकालीन विभागाला कळवले.

जळगाव : धानोरा (ता. जळगाव) येथील कांताई बंधाऱ्यात राजेश प्रकाश चव्हाण (वय २०, रा. धानवड) हा तरुण पाय घसरून पाण्यात पडल्याने बेपत्ता झाला होता. सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात वाहून गेलेल्या राजेश चव्हाण या तरुणाचा आज संध्याकाळी मृतदेह सापडला. 

यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने कांताई बंधाऱ्याच्या परिसराला प्रेक्षणीय स्थळाचे स्वरूप आले आहे. शहरासह ग्रामीण भागातील तरुणांची या परिसरात पिकनीकसाठी गर्दी वाढली आहे. धानवड येथील रहिवासी राजेश प्रकाश चव्हाण (वय २०) हा तरुण मित्रांसोबत शनिवारी (ता. १२) बंधाऱ्यावर आला होता. नदीपात्रात उतरून मोबाईल फोन मध्ये सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना पाय घसरून राजेश खाली कोसळला. घटनेचे वृत्त कळताच पोलिस पाटलांनी तालुका पोलिसांसह, महापालिकेच्या आत्पकालीन विभागाला कळवले. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, उमेश भांडारकर, संजय भालेराव, अनिल मोरे, विजय दुसाने, हरिलाल पाटील यांच्यासह पोहणाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, राकेशचा मृतदेह सापडला नव्हता. 

खेडीत आढळला मृतदेह 
मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नदीकाठावरील गावांत पेालिस पाटील व ग्रामस्थांना सूचना करण्यात आल्या होत्या. अखेर सोमवारी संध्याकाळी खेडी गावातील म्हसोबा मंदिराजवळील नाल्याला लागून राजेश चव्हाण या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon kantai bandhara selfie and boy dead