
केशवस्मृती प्रतिष्ठानने बेघर निवारा केंद्र सुरू केले. भीक मागणाऱ्या वृद्धांना त्यापासून परावृत्त करून त्यांना निवारा केंद्रात आणून समुपदेशन करून कुटुंबाचा शोध घेऊन त्यांच्या हवाली करणे हाच उद्देश आहे. आजपर्यंत येथे 52 वृद्ध राहत असून, 13 जणांना कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना घरी पाठविले. निवारा केंद्रातील नागरिकांची वेळोवेळी काळजी घेण्यावर भर दिला जातो.
-दिलीप चोपडा, निवारा केंद्र प्रकल्पप्रमुख
जळगाव : केशवस्मृती सेवा संस्था समूहाच्या माध्यमातून विविध सामाजिक, वैद्यकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रकल्प राबविले जात आहेत. याच अनुषंगाने त्यांनी नुकतेच जळगावात "बेघर निवारा केंद्र' या नवीन प्रकल्पाची मुहूर्तमेढ केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यावरील 60 वर्षांवरील नागरिक, भिकारी, निराधार, बेघरांना हक्काचा आसरा प्राप्त झाला आहे. आज या निवारा केंद्रात 24 पुरुष व 28 महिलांची निवास, भोजन व्यवस्था केली आहे; तर आतापर्यंत 13 जणांना समुपदेशन करून त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेऊन कुटुंबाच्या स्वाधीन केले.
आवर्जून वाचा - माझे पप्पा चालत गेले...परत आलेच नाही!; पितृछत्र हरपलेल्या मुलाचे अश्रू अनावर
केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे शहरातील बसस्थानक परिसरातील भजेगल्लीत दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत महापालिकेच्या नाइट शेल्टरचा उपक्रम शहरी बेघर निवारा केंद्राची सुरवात जानेवारी 2020 पासून करण्यात आली. निवारा केंद्रात आजपर्यंत 52 बेघरांना आसरा मिळाला असून, कुटुंबापासून दूर असले, तरी या ठिकाणी त्यांनी स्वत:चेच नवीन कुटुंब तयार करून मोठ्या आनंदाने आसरा घेतला आहे.
दोनवेळच्या भोजनाची सोय
निवारा केंद्रातील नागरिकांना दररोज सकाळी चहा, नाश्तासोबत दुपारचे व रात्रीच्या भोजनाची सोय या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. भोजनासाठी स्वतंत्र रूम तयार करण्यात आला असून, तेथे टेबल-खुर्चीची व्यवस्था आहे.
काळजीवाहक करतात सुश्रूषा
निवारा केंद्रात हक्काचा आसरा मिळावा, यासाठी दाखल झालेल्या सर्व वृद्धांची सेवा करण्यासाठी केंद्रात एक महिला व दोन पुरुष असे तीन काळजीवाहक असून, त्यांच्यावर देखरेखीसाठी एका व्यवस्थापकाची नियुक्ती केलेली आहे. ते सर्व सुश्रूषा करतात.
"कोरोना'च्या काळात आरोग्य तपासणी
सध्या "कोरोना'चा प्रार्दुभाव वाढल्याने निवारा केंद्रातील निराधारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे. दररोज त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी आयुष काढाही दिला जात आहे. सोबतच मास्कचा वापर, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात आहे.
करमणुकीसाठी कार्यक्रम
म्हातारपणी निवारा केंद्रात करमणूक व्हावी, यासाठी दररोज सकाळ-सायंकाळ आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन केले जाते. त्यानंतर आपल्यातील असलेली कला, कविता, नाटके, एकपात्री प्रयोग, चुटकुले आदी गमतीशीर कार्यक्रमही सादर करून दिवसभर मनोरंजन म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच टीव्हीवरील बातम्या, महाभारत पाहणे, वर्तमानपत्रे व पुस्तक वाचणे असा नित्यक्रमही सुरू असतो.
देणगीदारांकडून मदतीचा ओघ
निवारा केंद्रात जेवण, चहा, नाश्ता यासाठी देणगीदार स्वत:हून भोजनासाठी लागणारे साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात मदत देऊ करतात. काही जण या ठिकाणी येऊन आपल्या मुलांचा वाढदिवसही वृद्धांसोबत साजरा करून त्यांना आनंदात सहभागी करून घेतात.
मायलेकींचा बनले आधार
उमाळा रस्त्यावर गेल्या तीन महिन्यांपासून एक महिला आपल्या अडीच-तीन वर्षांच्या मुलीसह वास्तव्यास होती. हा प्रकार काही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ निवारा केंद्राशी संपर्क साधून या मायलेकींना निवारा केंद्रात आश्रय मिळाला. भेदरलेल्या अवस्थेतील महिलेला तिच्या कुटुंबाचा शोध घेऊन पोहोचविले जाणार असल्याचे निवारा केंद्राच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
मला मूलबाळ नसून, पत्नीचेही निधन झाले आहे. मागील चार महिन्यांपासून निवारा केंद्रात दाखल झालो. या ठिकाणी कुटुंबाप्रमाणे सोय होत आहे. सोबतच्या मित्र परिवारासोबत दिवस कुठे निघून जातो, ते कळत नाही. निवारा केंद्राचे व्यवस्थापन अगदी नियोजनबद्ध असून, येथे मला खूप समाधान वाटते.
- नारायण साळुंके, निवारा केंद्रातील वृद्ध
मी शहरातीलच पिंप्राळा परिसरातील रहिवासी आहे. माझ्या तिन्ही मुलांसह पतीचा मृत्यू झाल्याने मी एकटी पडली. मनात आत्महत्येचा विचार आला. परंतु निवारा केंद्रात आल्यावर मला पुन्हा एक कुटुंबच मिळाल्याची प्रचिती आली. येथील काळजीवाहक आईप्रमाणेच माझी सेवा करीत असल्याने मी येथे समाधानी आहे.
- यमुना खैरनार, निवारा केंद्रातील वृद्धा