जळगाव जिल्ह्यात काय बंद, काय सुरू राहणार...तर मग, वाचा सविस्तर ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित झोनमध्ये सर्व व्यवहार बंद राहतील. मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत.

जळगाव: जिल्ह्यात "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आले असून, जळगाव शहर व जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून रेड झोन (जळगाव महापालिका) व जिल्ह्यात इतर ठिकाणी अत्यावश्‍यक सेवेसह इतरही व्यवहार 3 जूनपासून टप्प्याटप्याने सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे परवानगी दिली आहे. मात्र, मॉल्स, चित्रपटगृह, शाळा, बार आणि बाजार संकुले, हॉटेल बंदच राहणार आहेत. या आदेशामुळे एकल दुकान असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला असला तरी जळगाव शहरातील संकुल असलेले फुले मार्केट, गोलाणी मार्केट व इतर संकुले बंद राहणार आहेत. 

दरम्यान, गेल्या महिन्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर 5 मेपासून शहरातील एकल दुकाने सुरू झाली व 10 मेपासून पुन्हा बंद झाली होती. त्यामुळे आता पुन्हा एक महिन्यानंतर दुकाने सुरू होणार आहेत. हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टारंट, नाश्‍त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, मॉल, सलून बंद राहणार आहेत. 

राज्य सरकारने लॉकडाउनबाबतची नियमावली रविवारी जाहीर केली. त्यानुसार शहर व जिल्ह्यात 3 जूनपासून तीन टप्प्यात लॉकडाऊन शिथिल होणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व बाजार, दुकाने, सार्वजनिक मैदाने खुली होणार आहेत. मात्र मॉल्स, चित्रपटगृह, शाळा, बार आणि बाजार संकुले बंदच राहतील. बाजार व दुकाने सम-विषम तत्त्वावर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित झोनमध्ये सर्व व्यवहार बंद राहतील. मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे. 

धार्मिक स्थळे आणि उपासना स्थळे, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. सायकलिंग, धावणे, चालणे, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मैदानेही खुली केली जाणार आहे. 8 जूनपासून सर्व खासगी कार्यालये आवश्‍यकतेनुसार 10 टक्केपर्यंत कर्मचाजयांसह सुरू करता येतील आणि उर्वरित व्यक्ती घरून काम करू शकतील. 

पहिला टप्पा : व्यायाम करण्यास जाण्याची परवानगी 
प्लंबर, इलेक्‍ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशी काम करणाजया तंत्रज्ञ यांना सुट देण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून काम करावे लागणार आहेत. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती न्यावे लागणार आहे. जेणेकरून तिथे जास्त गर्दी होणार नाही. सामूहिक (ग्रुप) हालचालींना परवानगी मात्र नाकारण्यात आली आहे. लहान मुलांसोबत पालकांना थांबणे आवश्‍यक करण्यात आले आहे. केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

दुसरा टप्पा : एक दिवस आड दुकाने उघडणार 
दुसजया टप्प्यात 5 जूनपासून मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्‍सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली असून दुकानांमधील ट्रायल रूम मात्र बंद राहणार आहेत. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाकारण्यात आली आहे. व्यवहार सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांवर सोपवण्यात आली आहे. त्यांना होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी लागणार आहे. 

वाहनाचा वापर टाळा 
खरेदीसाठी जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे लागणार आहे, आवश्‍यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

तिसरा टप्पा : वृध्द व लहान मुलांना बाहेर फिरण्यास मनाई लॉकडाउन शिथिलता देण्याचा तिसरा टप्पा 8 जूनपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात. इतरांना वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. 65 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना घरातच राहावे लागणार आहे. कंटेन्मेंट झोन हा एकदा परिसर, नगर, इमारत, झोपडपट्टी किंवा शहरात घोषित केला जाणार असून या भागात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व सेवा बंद असतील. 

रात्री 9 ते सकाळी 5 यावेळेत जमावबंदी 
रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडक बंद पाळण्यात येणार आहे. यावेळेत फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहणार आहे. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळेतही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू असणार आहे. 

महापालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच व्यवहार 
जळगाव शहर वगळता तसेच जिल्ह्यात जेथे प्रतिबंधीत क्षेत्र आहे ते क्षेत्र वगळून जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने सुरू करण्यास 19 मे रोजीच्या आदेशात परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हे आदेश कायम राहून व्यवहार सुरू राहतील. मात्र जिल्ह्यातीलदेखील हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टारंट, नाश्‍त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, मॉल, सलून, चित्रपटगृह बंद राहणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lokdown There will be single shops in the district