तब्बल बारा दिवसांपासून पावसाची ओढ.. उकाड्याने नागरिक हैराण !

देविदास वाणी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिल्हया्च्या शेजारील जिल्ह्यात पाऊस होतो यामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा होतो. मात्र जळगाव जिल्हयात अत्यल्प पावसावर समाधान मानावे लागते.

जळगाव  ः शहरासह जिल्ह्यात पावसाने तब्बल बारा दिवसांपासून ओढ दिली आहे. दिवसा कडक पडणाऱ्या उन्हामुळे पिके जळू लागली आहेत. दिवसभर कडक उन्ह, रात्री असह्य उकाडा, त्यात विजेचा लपंडाव यामुळे नागरिक हैराण झाले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ५६ टक्के पाऊस झाला आहे. तरीही वातावरणात गारवा निर्माण झालेला नाही यामुळे उकाडा होत आहे. 

हवेत दमटपणा असल्याने घामाच्या धारा वाहताना दिसतात. रोज सायंकाळी पावसाचे वातावरण होते. मात्र हवेतील ढग दुसरीकडेच जातात. यामुळे पाऊस पडत नाही. वातावरण गार होत नाही. जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेस विदर्भात पाउस पडला की हतनूर धरण भरू लागते. यामुळे हतनूरचे दरवाजे उघडले जातात. दक्षिणेकडे औरंगाबादला जोरदार पाऊस झाला की अजिंठा लेण्यातून पाणी खाली उतरत वाघूर धरणात साठते. आतापर्यंत वाघर धरण ७५ टक्के भरले आहे. यामुळे धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले होते. म्हणजे जळगाव जिल्हया्च्या शेजारील जिल्ह्यात पाऊस होतो यामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा होतो. मात्र जळगाव जिल्हयात अत्यल्प पावसावर समाधान मानावे लागते. उकाडा व कडक उन्हामुळे पावसाचे वातावरण तयार होते मात्र पाऊस पडत नाही. जागतिक तापमान वाढीचा हा परिणाम असल्याचे जलतज्ञ सांगतात. 

९७ टक्के पेरण्या पूर्ण.. 
जिल्ह्यात यंदा खरिपाच्या ९७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. सात लाख हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यात ५ लाख २५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. उर्वरित पिकांमध्ये मूग, उडीद, भुईमूग, मका, ज्वारी आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. आत्तापर्यंत पडलेल्या पावसामुळे पिकांची वाढ होत आहे. मात्र काही ठिकाणी पिकेही जळू लागली आहे. 

 

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Longing for rain for 12 days Crops began to burn